७५००० रोजगार, शिंदे-फडणवीस सरकारचा महासंकल्प; २ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:35 PM2022-11-03T12:35:27+5:302022-11-03T12:35:50+5:30
शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मुंबई - आज ज्यांना नियुक्त करतोय त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही शासकीय नोकरीत आला. ती नोकरी नसून सेवा आहे. तुम्ही सेवेकरी म्हणून राज्यातील जनतेला सेवा देताय. आपल्या सेवेचा भाव कधी कमी होणार नाही ही अपेक्षा आहे. सामान्य माणसाला तेवढेच महत्त्व मिळेल जेवढे एखाद्या महत्त्वाच्या श्रीमंत माणसाला मिळेल. सरकारी कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीच्या मनात शंका राहणार नाही असं काम करा असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिला.
मुंबईत महासंकल्प रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, एका वर्षात ७५ हजार रोजगार देत आहोत. पुढील काळात अन्य भरती करणार आहे. शासकीय नोकर भरतीत कुठल्याही चूका होऊ नये अशी काळजी घेतली जाईल. नोकरी भरतीविरोधात कोर्टात कुणी गेले तर पुढच्या सर्व भरती रखडल्या जातात. लवकरच महारोजगार मेळावा भरवून १ लाख नोकर भरती केली जाईल. शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
त्याचसोबत आपल्या राज्यात पहिले कौशल्य विद्यापीठ उभे राहिले आहे. स्टार्टअपबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे. नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देण्यावर तरुणांचा भर आहे. देशातील ८० हजार स्टार्टअपपैकी १५ हजार स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. हे स्टार्टअप मोठे होऊन हजारो कोटींचे उभे होतात. देशातील १०० यूनिकॉनमध्ये २५ यूनिकॉन्स महाराष्ट्रात आहे. तरुणाईला स्टार्टअप केल्यानंतर त्याला सातत्याने मदत करणं ही भूमिका राज्याची आहे. स्वयंरोजगारासाठी राज्य शासन विविध योजनातून मदत करते. शासकीय कर्मचारी म्हणून भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पारदर्शकपणे काम करावं. तुम्ही खूप पुढे जा, प्रगती करा. कामामुळे बढती मिळायला हवी असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नकारात्मक वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्न
राज्याच्या दृष्टीने हा आनंद सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भरती कधी होणार, नियुक्त्या कधी होणार असे मेसेज सातत्याने यायचे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, अमृत महोत्सव साजरा केला जातोय. आमचं सरकार आल्यानंतर ७५ हजार नोकऱ्या देऊ असं घोषित केले होते. पुढील भरती टप्प्याटप्प्याने करणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. विविध प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळतोय. राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम राज्य सरकार करतंय. वेळेत नोकरी मिळायली पाहिजे ही भावना तरुणांची योग्य आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार जणांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. प्रत्येक विभागानुसार जी रिक्त पदे आहेत ती भरण्याचा निर्णय घेतला आहे. भरतीला वेग आला पाहिजे. वेळेत झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेले अडीच वर्ष केवळ घोषणा होत होत्या. सरकार बदललं, वातावरण बदललं, सगळीकडे उत्साह, चैतन्य आले. सण, उत्सव साजरे झाले पाहिजेत. नकारात्मक वातावरण होतं त्यात सकारात्मकता आणण्याचं काम आम्ही करतोय. आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"