यवतमाळ जिल्हा बँकेतील ७६ कोटींचा हिशेब जुळेना
By Admin | Published: December 25, 2016 01:51 AM2016-12-25T01:51:59+5:302016-12-25T02:06:59+5:30
नोटाबंदीनंतर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७६ कोटींच्या नोटा जमा झाल्या. मात्र नाबार्डने केलेल्या चौकशीत या नोटांचा हिशेबच लागला नाही.
यवतमाळ : नोटाबंदीनंतर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७६ कोटींच्या नोटा जमा झाल्या. मात्र नाबार्डने केलेल्या चौकशीत या नोटांचा हिशेबच लागला नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या व्यवहाराबाबत नाबार्डला संशय कायम असून, नव्याने रेकॉर्ड मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
८ नोव्हेंबरला नोटा बंद केल्यानंतर १० ते १२ नोव्हेंबर या तीन दिवसांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली. परंतु तीन दिवसांत प्राप्त झालेल्या या ७६ कोटींच्या नोटांबाबतही रिझर्व्ह बँकेला संशय आहे. या नोटा मोठ्या प्रमाणावर बँकेच्या तिजोरीतूनच परस्पर बदलविल्या गेल्या असाव्यात, ही शक्यता गृहीत धरून रिझर्व्ह बँकेने नाबार्डला चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार नाबार्डच्या चमूने बँकेच्या ९४ शाखांमध्ये तपासणी केली. कॅश बुक, विवरण तपासून त्याच्या झेरॉक्स सोबत नेल्या. आठवडाभर तपासणी केल्यानंतरही विवरण पत्र आणि प्रत्यक्ष नोटा याचा ताळमेळ जुळला नाही. पर्यायाने जुन्या नोटा थेट जिल्हा बँकेच्या तिजोरीतून परस्पर बदलण्यात आल्याचा नाबार्डचा संशय कायम आहे. त्यामुळेच नाबार्डने फेरतपासणीची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी)