कर्जमाफीसाठी ७७.२९ लाख अर्ज!, १५ लाख खातेदारांच्या माहितीची तपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:06 AM2017-10-05T05:06:43+5:302017-10-05T05:07:17+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५६.५९ लाख शेतकरी कुटुंबांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५६.५९ लाख शेतकरी कुटुंबांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये ७७.२९ लाख खातेदारांचा समावेश आहे. सर्व बँकांची परिपूर्ण माहिती प्राप्त झालेल्या जिल्ह्यात तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जदार शेतकºयांची विहित नमुन्यातील माहिती (६६ रकाने) आॅनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू असून, व्यापारी बँकांची विहित नमुन्यात माहिती संबंधित बँकांचे सक्षम अधिकारी यांचेकडून प्रमाणित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची माहिती सहकार विभागाचे लेखापरीक्षक यांचेमार्फत पडताळणी करण्यात येत आहे. ३ आॅक्टोबर २०१७पर्यंत विविध ३२ व्यापारी बँकांनी २०.५४ लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती तसेच ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ३६.३६ लाख खातेदारांपैकी २०.३५ लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती भरून दिली आहे. त्यापैकी १५ लाख खातेदारांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांनी प्रमाणित केली आहे.
बँकांनी विहित नमुन्यात माहिती आॅनलाइन अपलोड केल्यानंतर योजनेच्या पात्रतेबाबत छाननी करण्यात येत असून, छाननीमध्ये पात्र ठरलेल्या खातेदारांबाबत चावडी वाचनामध्ये आलेल्या सूचना व माहितीचा विचार करून तालुकास्तरीय समितीद्वारे पात्र लाभार्थी शेतकºयांची यादी अंतिम करण्यात येत आहे.
आचारसंहिता लागू नसलेल्या गावांत चावडी वाचन
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू नसलेल्या गावात कर्जमाफीच्या माहितीचे चावडी वाचन करण्यात आले आहे. अन्य गावांत ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर चावडी वाचन करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.