आरटीई प्रवेशाच्या ७ हजार ७४९ जागा रिक्त

By Admin | Published: April 3, 2015 02:27 AM2015-04-03T02:27:05+5:302015-04-03T02:27:05+5:30

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई)मुंबई महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या खासगी

7,749 seats for RTE admission vacancy | आरटीई प्रवेशाच्या ७ हजार ७४९ जागा रिक्त

आरटीई प्रवेशाच्या ७ हजार ७४९ जागा रिक्त

googlenewsNext

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई)मुंबई महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील प्रवेशाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. ११ हजार ८३७ जागांसाठी आलेल्या ४ हजार ८८ अर्जांची सोडत काढण्यात आल्याने यंदा आरटीईच्या सुमारे ७ हजार ७४९ जागा रिक्त राहणार आहेत. ५८ शाळांत प्रवेश मिळविण्यासाठी एकाही पालकाने अर्ज केला नसल्याने ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात पालिकेच्या शिक्षण विभागाला अपयश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभल्याने अर्ज भरण्याची मुदत २३ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. आॅनलाइन प्रवेशासाठी पालिकेकडे सुमारे ४ हजार ८८ अर्ज आले होते. या अर्जांची आॅनलाइन सोडत गुरुवारी पालिकेच्या दादर येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. आरटीई प्रवेशासाठी ३१३ शाळांसाठी शिक्षण विभागाने आॅनलाइन अर्ज मागवले होते. त्यापैकी राज्य शिक्षण मंडळाच्या २७१ आणि आयसीएसईच्या ४२ शाळांत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. ३१३ शाळांपैकी अनेक शाळांमध्ये उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज कमी आल्याने या शाळांतील प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली नाही. पूर्व प्राथमिकच्या ९२ आणि इयत्ता पहिलीच्या ६८ शाळांमध्ये उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आल्याने या जागांसाठी सोडत काढण्यात आली. ५८ शाळांतील उपलब्ध जागांसाठी एकही अर्ज आला नसल्याचे, यावेळी शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी स्पष्ट केले. सोडतीत प्रवेश मिळालेल्या शाळेची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. हा एसएमएस आणि आॅनलाइन अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे शाळांमध्ये पालकांना दाखवावी लागणार आहेत. सोडतीमध्ये शाळा मिळाल्याचे शिक्षणाधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आॅनलाइनद्वारे शाळांना पाठविण्यात आले असून, शाळांना
ते डाऊनलोड करून घ्यावे
लागणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीमध्ये प्रवेश न मिळाल्यास दुसऱ्या टप्प्यात आॅनलाइन प्रवेश देण्यात येणार असल्याचे, जोगी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 7,749 seats for RTE admission vacancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.