रणरणत्या उन्हात ७९ वर्षीय शरद पवार यांनी राज्यभरात घेतल्या ७८ प्रचारसभा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:10 AM2019-04-29T03:10:45+5:302019-04-29T03:11:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा : राहुल गांधी यांनी ५ ठिकाणी केले संबोधित

78 assembly elections held in the state by 79-year-old Sharad Pawar! | रणरणत्या उन्हात ७९ वर्षीय शरद पवार यांनी राज्यभरात घेतल्या ७८ प्रचारसभा!

रणरणत्या उन्हात ७९ वर्षीय शरद पवार यांनी राज्यभरात घेतल्या ७८ प्रचारसभा!

Next

मुंबई : राज्यात तापमानाचा पारा ४० अंशाचा टप्पा पार केलेला असताना अशा रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता राजकीय नेत्यांनी राज्याचा कानाकोपरा पिंजून काढत सभांचे फड गाजवून सोडले. ७९ वर्षीय शरद पवार यांनी तर वाढते वय आणि आजाराला न जुमानता सर्वाधिक ७८ सभा घेऊन मैदान दाणाणून सोडले.

पहिल्यांदाच राज्यात चार टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीने राजकीय नेते आणि उमेदवारांचा चांगलाच घाम काढला. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार उभा केलेला नव्हता. तरीही मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सहा ठिकाणी सभा घेऊन भाजपविरोधात राळ उठविली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विविध विषयांवरील आधीची आणि आताची भाषणे दाखवून राज यांनी भाजपची चांगलीच कोंडी केली. त्यांच्या सभांना झालेली गर्दी हा चर्चेचा विषय ठरला. भाजपने शेवटच्या दिवशी राज यांना प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर दिवसाला तीन या प्रमाणे ७८ सभा घेऊन तरुण राजकीय नेत्याला लाजवेल अशा उत्साहात प्रचार सभांचा धडका लावला होता. उन्हाचा पारा ४०-४६ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला असताना अशा उन्हातही ७९ वर्षीय शरद पवारांच्या सभांचा धडका सुरूच होता. दिवसातून तीन सभांना शरद पवार हजेरी लावत असल्याचे पहायला मिळाले. तरुण राजकीय नेत्याला ही शक्य होणार नाही एवढी प्रचंड मेहनत शरद पवार घेताना दिसले. डोक्यावर प्रचंड उन्ह असताना पवारांनी आपल्या सभा पार पाडल्या. प्रचंड उन्हाचा पारा बघता अनेक उमेदवार आणि नेते सकाळी आणि संध्याकाळी प्रचाराला बाहेर पडताना पाहायला मिळत होते. शरद पवार याला अपवाद असून त्यांचा पूर्ण दिवस प्रचारात आणि प्रवासात व्यस्त असल्याचे दिसून येत होते.

याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर या नेत्यांनी सभांवर सभा घेऊन मैदान दणाणून सोडले.

गडकरींचे अर्धशतक! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही तब्येतीची तमा न बाळगता राज्यात पन्नासहून अधिक सभा घेऊन सभांचे अर्धशतक ठोकले. गडकरींची शेवटची सभा शिर्डी मतदारसंघात झाली. उन्हामुळे भोवळ आल्याने त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.

मोदींचा झंझावात
भाजपचे प्रमुख प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात १० ठिकाणी सभा घेतल्या. मुंबईत झालेली शेवटची सभा वगळता इतर सर्वच सभांमधून त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुंबई, नंदूरबार, पिंपळगाव बसवंत, वर्धा, गोंदिया, औसा, नांदेड, पांढरकवडा, नगर व अकलूज येथे मोदींच्या सभा झाल्या.

राहुल यांचा थेट संवाद
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुणे येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून राज्यात प्रचाराची सुरुवात केली. निवडणुकीपूर्वी त्यांनी पुणे आणि मुंबईत संवाद साधला, तर प्रचाराच्या दरम्यान त्यांनी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, नांदेड व संगमनेर अशा पाच ठिकाणी सभा घेतल्या.

Web Title: 78 assembly elections held in the state by 79-year-old Sharad Pawar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.