वेटरचे काम करून मिळविले ७८ टक्के
By admin | Published: June 11, 2016 01:08 AM2016-06-11T01:08:12+5:302016-06-11T01:08:12+5:30
शिक्षण घेण्याची जिद्द मनात असेल तर काम करूनही चांगले गुण मिळवता येत असल्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या १० वीच्या निकालानंतर आला.
वाघोली : घरची परिस्थिती हलाखीची असली तरी शिक्षण घेण्याची जिद्द मनात असेल तर काम करूनही चांगले गुण मिळवता येत असल्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या १० वीच्या निकालानंतर आला. पुणे-नगर महामार्गावरील पेरणे टोल नाक्याशेजारी शेजारी असणाऱ्या चंद्रमा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या मुकुंदा सोनोने या मुलाने १७ नंबरचा फॉर्म भरून १० वीच्या परीक्षेत ७८.२० टक्के मिळविले आहेत. वेटर काम करून मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दहावीचे शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून मुकुंदा सोनोने याने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. मूळचा जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथील असलेल्या मुकुंद काकाराव सोनोने याने २०१३मध्ये इयत्ता ९ वी मध्ये अर्धवट शिक्षण सोडून मित्रांबरोबर पुण्यामध्ये कामाकरिता आला होता. पुणे-नगर महामार्गावरील पेरणे फाट्याशेजारी असणाऱ्या चंद्रमा हॉटेलमध्ये मित्रांसोबत काम करू लागला. ते करता करता परीक्षा दिली व त्यात यश मिळविले.
>हॉटेलमधील काम बंद करून शिक्षण घेतले तर आर्थिक स्थिती ढासळेल म्हणून यापुढेही हसनाबाद येथील विद्यालयामध्ये बाहेरूनच प्रवेश घेऊन पदवीचे प्रशिक्षण घेण्याचा मानस आहे. यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे ध्येय आहे.
- मुकुंदा सोनोने
मुकुंदा गेल्या ३ वर्षांपासून नियमितपणे हॉटेलमध्ये काम करीत आहे. त्याच्यात शिकण्याची जिद्द असल्यामुळे हॉटेलमधील सर्वांनीच त्याला आधार देऊन प्रोत्साहित केले. त्याला मिळालेले ७८ टक्के म्हणजेच ९० टक्के पडल्यासारखे मानतो.
- दशरथ जेधे, हॉटेलचालक