‘जम्पिंग चिकन’मुळे बेडकांच्या 78 प्रजाती डेंजर झोनमध्ये
By admin | Published: June 11, 2016 07:57 PM2016-06-11T19:57:27+5:302016-06-11T19:59:33+5:30
‘जम्पिंग चिकन’ या नावाने खवय्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या बेडकांची गोव्यात मोठय़ा प्रमाणावर हत्या केली जाते त्यामुळे गोव्यात बेडकांच्या नऊ संरक्षित जाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत
Next
>सुशांत कुंकळयेकर : मडगाव
गोव्यातील स्थिती : परराज्यांतही तस्करी, नऊ संरक्षित जातीही नामशेष होण्याची भीती
पणजी, दि. 11 - ‘जम्पिंग चिकन’ या नावाने खवय्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या बेडकांची गोव्यात मोठय़ा प्रमाणावर हत्या केली जाते. त्यामुळे गोव्यात बेडकांच्या नऊ संरक्षित जाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. भारतात सापडणा-या बेडकांच्या एकूण 340 प्रजातींपैकी 78 प्रजाती अशा हत्यांमुळे धोक्यात आल्या आहेत. बेडकांच्या हत्येला बंदी असूनही पहिल्या पावसात शेतात येणा-या बेडकांची खाण्यासाठी सर्रास शिकार केली जाते. वन खात्याच्या संरक्षकांना झुकांडी देत हे प्रकार गोव्यात राजरोस चालू आहेत.
बेडकांचे मांस गोव्यात एक ‘डेलिकसी’ म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: बेडकांच्या तंगडय़ांना अधिक मागणी आहे. दक्षिण गोव्यात सासष्टीत बेडकांची हत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. पावसात बेडकांचे मांस काही हॉटेल्समध्येही उपलब्ध असते. मात्र, हे मांस उघडपणे विकले जात नाही, अशी माहिती सासष्टीतील या व्यवसायाशी संबंधिताने दिली. बेडकांच्या तंगडय़ांना गोव्याबाहेरही मागणी असल्याने कित्येकवेळा बेडकांची अन्य राज्यांतही तस्करी केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या पावसातच मडगावपासून 15 किलोमीटरवरील पारोडा गावात रात्रीच्यावेळी बेडूक पकडताना दोघाजणांना अटक केली, तर मडगावपासून 50 किलोमीटरवर नेत्रवळी अभयारण्य परिसरात एकाला अटक करण्यात आली. आतार्पयत बेडूक पकडणा-या सहाजणांना वन खात्याने अटक केली आहे आणि सुमारे 100 बेडकांना वाचविल्याची माहिती वन खात्याकडून मिळाली आहे.
78 प्रजाती धोक्यात
भारतीय वन्यजीव मंडळाने केलेल्या पाहणीत भारतात एकूण 340च्या आसपास बेडकांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी 78 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाट क्षेत्रात येणा-या गोव्याच्या कक्षेत यापैकी 40 टक्के प्रजाती सापडलेल्या आहेत. मात्र, याबद्दलचे संशोधन अजूनही चालू आहे. अतिशय संवेदनशील अशी प्रजाती असलेल्या राणा टायग्राना या जातीच्या बेडकांची गोव्यात अधिक प्रमाणात हत्या होते. त्याशिवाय काहीसा जाडा असल्याने स्थानिकांमध्ये बुल फ्रॉग म्हणून प्रसिध्द असलेल्या बेडकांनाही सर्रास कापले जाते.
बापरे, एकालाही शिक्षा नाही!
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 प्रमाणो बेडकांना पकडण्यावर किंवा त्यांच्या तंगडय़ांची निर्यात करण्यावर बंदी आहे. असा गुन्हा केल्यास एक ते सहा वर्षार्पयत तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयांर्पयत दंड, अशी शिक्षा आहे. गुन्हा गंभीर असल्यास कैद व दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गोव्यात दरवर्षी आठ ते दहा जणांवर अशाप्रकारचे गुन्हे केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले जाते. मात्र, आजर्पयत बेडकांची हत्या केल्याबद्दल कोणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत आरोपी सुटतात.
जम्पिंग चिकन मेनू
बेडकांचे मांस व्हाईट मीट या प्रकारात मोडते. चिनी व कॉन्टिनेन्टल आहार पध्दतीत बेडकांच्या मांसाचा समावेश असतो. गोव्यात बेडकांचे मांस मसाला फ्राय, चिली फ्राय, बटर गार्लिक त्याचप्रमाणो बेडकांच्या तंगडय़ांवर केवळ मिरी, मीठ व लिंबू लावून नीट फ्राय करूनही ते खाल्ले जाते. बेडकाचे मांस दम्याच्या विकारावर गुणकारी असा चुकीचा समज आहे. त्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर बेडकांची हत्या केली जाते.
पर्यावरणीय साखळीसाठी बेडूक हा अत्यंत महत्त्वाचा जीव असल्याने त्याची हत्या करणे म्हणजे पर्यावरणाची साखळी तोडण्यासारखे होते. बेडकांची हत्या होऊ नये यासाठी संपूर्ण वन खाते सतर्क असते. अशा प्रकारचा गुन्हा केल्यास सहा वर्षार्पयतची शिक्षा होऊ शकते. त्याहीपेक्षा बेडूक हा पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा घटक हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
- सिद्धेश गावडे, मडगाव रेंज फॉरेस्ट अधिकारी
बेडूक हा पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असून या बेडकांच्या संहारामुळे पश्चिम घाटातील पर्यावरणाचे संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. एक गोष्ट लक्षात ठेवणो आवश्यक आहे, डासांची अंडी हे बेडकांचे खाद्य आहे. गोव्यात बेडकांचे प्रमाण कमी झाल्यास डासांचे प्रमाण वाढेल आणि मलेरियासारखे रोग पसरतील, याची जाणीव लोकांनी ठेवण्याची गरज आहे.
- राजेंद्र केरकर, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक