१२ वीच्या ७९ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:12 AM2018-03-01T03:12:47+5:302018-03-01T03:12:47+5:30
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी विविध मागण्यांसाठी १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने, तब्बल ७९ लाख ८५ हजार उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.
पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी विविध मागण्यांसाठी १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने, तब्बल ७९ लाख ८५ हजार उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बुधवारी मुंबईत झालेल्या चर्चेतूनही मार्ग न निघाल्याने तिढा कायम असून, त्यामुळे निकालदेखील लांबण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेस २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून उत्तरपत्रिका तपासणीस सुरुवात केली जाते. मात्र, ७ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही शिक्षकांनी उत्तरपत्रिकांना हात लावलेला नाही. राज्य मंडळातर्फे इंग्रजी, हिंदी, मराठी, भौतिकशास्त्र, एस.पी., राज्यशास्र, सहकार, उर्दू, भूगर्भ शास्र या विषयांच्या मुख्य नियामकांच्या (चिफ मॉडेÑटर) सभा पुण्यात झालेल्या नाहीत, तसेच सर्व विभागातील या विषयांच्या नियमकांच्याही नियोजित सभाही झालेल्या नाहीत. मंगळवारपर्यंत सुमारे ६५ लाख उत्तपत्रिका तपासणीविना पडून होत्या. बुधवारी त्यात रसायनशास्त्रासह इतर विषयांच्या आणखी १४ लाख ८५ हजार उत्तरपत्रिकांची भर पडली आहे.