दिवाळीमध्ये ७वा वेतन आयोग लागू करणार, मुनगंटीवार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 06:17 AM2018-07-19T06:17:22+5:302018-07-19T06:17:34+5:30
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.
- गौरीशंकर घाळे
नागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. आयोग लागू केल्यानंतर सरकारी तिजोरीवर २१ हजार ५३० कोटी रुपयांचा बोजा पडेल.
केंद्रीय कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ पासून वेतन आयोग लागू झाला. त्यानुसार, राज्य कर्मचाºयांना लाभ दिले जातील. त्यासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करताना थकबाकीची रक्कम त्यांच्या पीएफमध्ये जमा होईल, असे वित्तमंत्र्यांनी सांगितले.
वेतन आयोगामुळे राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज झाल्याचा विरोधी पक्षाचा दावा चुकीचा आहे. मार्च २०१९ अखेर राज्यावरील बोजा ४ लाख ६१ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. राज्याच्या सकल उत्पन्नावर कर्जाचा बोजा मोजला जातो. आपल्याला सकल उत्पन्नाच्या २५ टक्के कर्ज काढण्याची मुभा असली, तरी आजमितीला राज्यावरील कर्जाचे प्रमाण हे १६.५ टक्के इतके आहे.
जीएसटीमुळे राज्याचे उत्पन्न वाढले. एप्रिल ते जून २०१७ या काळात २५ हजार ७४२ कोटी रुपये मिळाले. जीएसटीनंतर २०१८ मध्ये या काळात ३५ हजार ९१५ कोटी रुपये मिळाले. ही ३९.५२ टक्के वाढ आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महसुली खर्च कमी
महसूल वाढत असताना महसुली खर्च ५० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर आणण्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले.