तरुणीवर अत्याचारप्रकरणी तीन पोलिसांसह ८ अटकेत
By admin | Published: April 25, 2015 04:19 AM2015-04-25T04:19:02+5:302015-04-25T04:19:02+5:30
पंचतारांकित हॉटेलबाहेरून तरुणीचे अपहरण करणे, चौकीत आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे, तिचे दागिने हिसकावणे आणि तिच्या मित्राकडून साडेचार
मुंबई : पंचतारांकित हॉटेलबाहेरून तरुणीचे अपहरण करणे, चौकीत आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे, तिचे दागिने हिसकावणे आणि तिच्या मित्राकडून साडेचार लाखांची खंडणी उकळणे या गुन्ह्यात साकीनाका पोलीस ठाण्याच्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एकूण आठ जणांना गुन्हे शाखेने गजाआड केले. त्यात एका महिलेचा सहभाग असून, गुन्ह्यात तिने महिला पोलीस असल्याचे भासवले होते.
एपीआय सुनील खटापे, सुरेश सूर्यवंशी, शिपाई योगेश पोंडे, जावेद इब्राहिम शेख, इब्राहिम बिस्मिल्ला खान ऊर्फ इमू, तन्वीर हाश्मी, संजय रोंग्ये ऊर्फ राहुल आणि आयेशा मालवीया अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी तक्रारदार तरुणीने एपीआय खटापेविरोधात पोलीस चौकीत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या सर्वांविरोधात बलात्कार, खंडणी, जबरी चोरी
असा गंभीर गुन्हा नोंद आहे. न्यायालयाने या सर्वांना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत धाडले. गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत कठोर कारवाई होईल, या भीतीने आरोपी पोलीस अधिकारी बलात्कारासारखा गंभीर गुन्हा नाकबूल करीत आहेत. त्यामुळे नेमके काय घडले, हे स्पष्ट करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत आहेत.
मॉडेल असल्याचा दावा करणाऱ्या तरुणीने दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त राकेश मारिया, सहआयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन तक्रार दिली. तक्रारीनुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे एपीआय खटापे, सुरेश सूर्यवंशी, शिपाई योगेश पोंडे आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी हॉटेल हॉलीडे इनबाहेरून अपहरण केले, तेव्हा तिच्यासोबत तिचा मित्रही होता. पोलीस चौकीत आणून तरुणीवर वेश्या, तर तिचा मित्र दलाल असल्याचा आरोप केला. त्यानुसार स्थानिक कायद्यानुसार बाराशे रुपयांचा दंड आकारला. या प्रकरणातून सुटका करण्यासाठी तरुणीच्या अंगावरील सुमारे पाच लाखांचे दागिने, घड्याळ आणि अन्य मौल्यवान वस्तू हिसकावल्या. मित्राकडून ४ लाख ३५ हजार रुपयांची खंडणी उकळली. मित्र व अन्य आरोपी बाहेर असताना एपीआय खटापे याने चौकीत तरुणीवर लैंगिक अत्याचार केले.
हे ऐकून मारिया यांनी तत्काळ या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या एमआयडीसी युनिटला दिले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षिका गोपिका जहागिरदार आणि पथकाने तत्काळ हालचाल करीत एकूण आठ जणांना गजाआड केले. अटकेनंतर पोलिसांनी जबाबात अपहरण, जबरी चोरी व खंडणीचा गुन्हा कबूल केला. मात्र बलात्काराचा गुन्हा नाकबूल केल्याची माहिती मिळते. गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी तक्रारदार तरुणीचे दागिने, महागडे घड्याळ आणि अन्य मौल्यवान वस्तू असा एकूण चार लाख ९० हजारांचा ऐवज हिसकावला. तर तिच्या मित्राकडून चार लाख ३५ हजारांची खंडणी उकळली.
तक्रारदार तरुणी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भाग आहे. ती एका एस्कॉर्ट एजन्सीसाठी काम करते. तिला रंगेहाथ पकडण्यासाठी हॉलीडे इनमध्ये सापळा रचला होता. त्यासाठी आम्ही एक तोतया ग्राहक हॉटेलच्या खोलीत बसवला होता. ही तरुणी तेथे आली. मात्र कागदपत्र, ओळखपत्र नसल्याने तिला हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीत सोडले नाही. त्यामुळे आमचा सापळा फसला. मात्र ती बाहेर पडताच तिला आम्ही ताब्यात घेतले, असा दावा आरोपी पोलिसांनी केला आहे.
याबाबत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेलाही इच्छा असते. तिच्या इच्छेविरोधात किंवा सहमतीविरोधात जबरदस्ती केल्यास तो बलात्काराचा गुन्हा ठरतो. पत्नीलाही पतीविरोधात अशी तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तक्रारदार तरुणीचा पेशा काय, यापेक्षा तिच्यावर घडलेला गुन्हा आणि त्याचा तपास महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी दिली आहे.
आरोपींची वैद्यकीय चाचणी झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी, त्यांनी या कारवाईबाबत पोलीस ठाण्यात केलेल्या डायरी एन्ट्रीची चाचपणीही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आरोपी पोलिसांनी रचलेल्या सापळ्याबाबत साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसन्ना मोरे यांच्याकडेही गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशी करणार आहेत. त्यांना या कारवाईची माहिती होती का, हे जाणून घेतले जाणार आहे.