जिल्हा बँकेत ८ कोटी ५२ लाखाचा कर्जवाटप घोटाळा

By Admin | Published: June 8, 2017 03:22 PM2017-06-08T15:22:08+5:302017-06-08T21:14:50+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्जवाटप घोटाळा प्रकरणी बुधवारी रात्री तडकाफडकी बँकेचे

8 crore 52 lakh loan disbursement scam in District Bank | जिल्हा बँकेत ८ कोटी ५२ लाखाचा कर्जवाटप घोटाळा

जिल्हा बँकेत ८ कोटी ५२ लाखाचा कर्जवाटप घोटाळा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 8 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्जवाटप घोटाळा प्रकरणी बुधवारी रात्री तडकाफडकी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक काँग्रेसचे सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार, पैठण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांच्यासह २२ संचालक , बँकेचे अधिकारी -कर्मचारी आणि २२ सहकारी सोसायट्यांंविरूद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यांमुळे सहकारक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हेशाखेकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अ‍ॅड. सदाशिव गायके यांनी याविषयी वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. २०११ ते २०१४ या कालावधीत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर पद्धतीने विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांना कर्जवाटप केले. ज्या सोसायट्यांना कर्ज वाटप करण्यात आल्या त्या संचालक मंडळाच्या नातेवाईकांच्या आहेत अथवा त्यांच्या मर्जीतील लोकांच्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रार अर्जाची चौकशी वर्षभरापासून आर्थिक गुन्हेशाखेचे अधिकारी कर्मचारी करीत होते. प्राथमिक चौकशीत बँकेच्या संचालक मंडळाने मर्जीतील आणि नातेवाईकांच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना तब्बल ८ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. एवढेच नव्हे तर त्यांनी हे कर्ज माफही करून टाकल्याचे समोर आआले. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे बँकेचे क ोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. दरम्यान पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना याप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी आर्थिक गुन्हेशाखेला याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच सहायक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे आणि कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला सोबत घेऊन क्रांतीचौक ठाण्यात बुधवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली. या फिर्यादीनुसार बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील, आ. अब्दुल सत्तार, आ. संदीपान भुमरे, शांतीलाल छापरवाल, जयराम साळुंके यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य, बँकेचे मुख्य व्यवस्थापक तसेच लाभधारक २२ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

सर्व आरोपी हजर होण्याच्या नोटीसा-
गुन्हा दाखल झालेले बहुतेक सर्व आरोपी हे राजकीय क्षेत्रातील आहेत.यामुळे त्यांना कायदेशीर नोटीसा पाठवून हजर होण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हेशाखेकडून देण्यात येत आहे. आयुक्तांच्या आदेशाने बुधवारी या नोटीसा पाठविण्याची कार्यवाही सुरू होती.

Web Title: 8 crore 52 lakh loan disbursement scam in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.