१५ आॅगस्ट पासून राज्यभरातील १ कोटी कंत्राटी कामगार जाणार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:49 PM2019-07-30T14:49:27+5:302019-07-30T14:51:21+5:30
वेतनवाढीच्या नावावर राज्यभरातील एक कोटी कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे याच्या निशेर्धात राज्य भरातील हे कामगार १५ आॅगस्ट पासून संपावर जातील असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
ठाणे - राज्यातील १ कोटी कंत्राटी कामगारांचे वेतन दुप्पट करण्याचा राज्यशासनाने केवळ धुळफेक केली असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने मंगळवारी ठाण्यात केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा अन्यथा येत्या १५ आॅगस्ट पासून राज्यभरातील तब्बल १ कोटी कंत्राटी कामगार संपावर जातील असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड आणि समितीचे समन्वयक नचिकेत मोरे यांनी दिला आहे.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील २३ संघटनांचे पदाधिकारीसुध्दा उपस्थित होते. मागील १० वर्षात कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. मात्र राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि तशी घोषणाही केली. मात्र प्रत्यक्षात वेतनात अवघी ३३८ रुपयांची वाढ करुन या मंडळींनी कंत्राटी कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले असल्याचा आरोप मोरे यांनी केला. या संदर्भात राज्य शासनाच्या संबधींत विभागाशी चर्चा केली असता, डीएमध्ये वाढ केल्याचे ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात वेतनात वाढ करण्यात न आल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या कामगारांच्या वेतनातमध्ये किमान २ हजार रुपयांची वाढ करण्यात यावी अशी माफक मागणी आम्ही केलेली आहे. मात्र त्याकडेही राज्यशासनाकडून दुर्लक्ष होतांना दिसत आहे. त्यामुळेच आता या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परंतु राज्यशासनाकडून यावर तत्काळ तोडगा काढण्यात आला नाही, तर १५ आॅगस्टपासून राज्यभरात कचरा उचलला जाणार नाही, लाईट सुरु राहणार नाही, पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आदींसह इतर सेवांवरही परिणाम होऊन राज्यभरातील १ कोटी कामगार हे संपावर जातील आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शासन असेल असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.