मारणे याच्या कोठडीत ८ दिवसांची वाढ
By admin | Published: December 19, 2014 01:53 AM2014-12-19T01:53:41+5:302014-12-19T01:53:41+5:30
नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे खूनप्रकरणी अटक गज्या मारणे याने गुन्ह्याचे नियोजन करून आरोपींना हत्यारे, अग्निशस्त्र, वाहने पुरवली होती.
पुणे : नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे खूनप्रकरणी अटक गज्या मारणे याने गुन्ह्याचे नियोजन करून आरोपींना हत्यारे, अग्निशस्त्र, वाहने पुरवली होती. तसेच, गुन्ह्यात निष्पन्न झालेली ३ अग्निशस्त्रे वापरानंतर पुन्हा विल्हेवाटीसाठी मारणेकडे जमा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
गजानन पंढरीनाथ मारणे (वय ४९, रा. हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरूड ) व रूपेश कृष्णराव मारणे (वय ३१, रा. कोथरूड) यांची गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांची २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविली. या प्रकरणी यापूर्वी अटक असणाऱ्या १३ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
याप्रकरणी संतोष कांबळे (वय २७, रा. दत्तवाडी) याने फिर्याद दिली आहे. मारणे टोळीने २९ नोव्हेंबर रोजी भर दिवसा वैकुंठ स्मशानभूमीजवळ घायवळ टोळीतील तिघांवर खुनी हल्ला केला होता. त्यात अमोल बधे याचा मृत्यू झाला होता; तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते.
गज्या मारणे व रूपेश मारणे यांनी फरार काळात लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकत घेतले आहे का, अगर बनावट नावाने मोबाईल हॅन्डसेट घेतला आहे का, याचा पुराव्याकामी तपास करायचा आहे. गुन्ह्याच्या स्थळावरून फरार होण्यासाठी कोणाची वाहने वापरली, ती जप्त करायची आहेत. फरार असताना दोघे आरोपी हे पुणे जिल्हा आणि राज्याबाहेर गेल्याचे सांगत आहेत. फरार असताना त्यांना कोणी मदत केली. सागर राजपूत, राकेश गायकवाड, तानाजी कदम, निखिल दुगाई यांचा शोध घ्यायचा आहे. टोळीच्या वर्चस्वातून त्यांनी आणखी कोठे शस्त्राचा साठा करून ठेवला आहे का, याबाबत तपास करायचा आहे, यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली.