स्वाइन फ्लूमुळे राज्यात ८ जणांचा मृत्यू
By Admin | Published: March 1, 2015 01:31 AM2015-03-01T01:31:26+5:302015-03-01T01:31:26+5:30
स्वाइन फ्लूने राज्यात आणखी८ जणांचा बळी घेतल्याने या वर्षातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १३३ वर पोहोचली आहे.
पुणे : स्वाइन फ्लूने राज्यात आणखी८ जणांचा बळी घेतल्याने या वर्षातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १३३ वर पोहोचली आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी दिवसभरात स्वाइन फ्लूचे १३९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या वर्षातील लागण झालेल्यांची संख्या १ हजार ६३५ वर पोहोचली आहे. यापैकी २७५ जण रुग्णालयात दाखल असून ३५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर, १६१ जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
फेब्रुवारी महिन्यापासून डोक वर काढलेल्या स्वाईन फ्लूमुळे दोन मुंबईकरांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ५२५ इतकी झाली असून मुंबई बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या १७ इतकी झाली आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी स्वाईन फ्लूचे ४० नवे रुग्ण मुंबईत आढळले असून मुंबई बाहेरून दोन नवे रुग्ण उपचारासाठी आले आहेत.
अंधेरी येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा २७ फेब्रुवारी तर अंधेरी येथेच राहणाऱ्या ६८ वर्षीय महिलेचा शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी कोकिलाबेन रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात स्वाइन फ्लूची सर्वाधिक तीव्रता नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे
या जिल्ह्यांमध्ये आहे. एक जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील १ लाख ४६ हजार ९३९ जणांची नोंद झाली आहे.