राज्यात उष्माघाताचे ८, पाणीटंचाईचे ३ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:04 AM2019-04-30T03:04:17+5:302019-04-30T06:35:38+5:30
राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने मराठवाड्यात ५ तर अकोल्यात २ व नगर जिल्ह्यात एक बळी गेला. पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांचा लातूर जिल्ह्यात गुदमरून मृत्यू झाला
औरंगाबाद/अकोला/लातूर : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने मराठवाड्यात ५ तर अकोल्यात २ व नगर जिल्ह्यात एक बळी गेला. पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांचा लातूर जिल्ह्यात गुदमरून मृत्यू झाला. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यात राजापूर येथील सुमंताबाई देवीदास बेडके(४५) यांना उन्हामुळे रविवारी ताप येऊन उलट्या झाल्या. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बीडसांगवी येथे दत्तात्रय चव्हाण (१७) यांचा उष्माघाताने शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव येथे उष्माघाताने संतोष नागरे (३५) याचा रविवारी मृत्यू झाला. वसमत तालुक्यातील लक्ष्मण कांबळे (४५) हे चक्कर येऊन पडले. उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ येथे उष्माघाताने व्यंकट म्हेकरे (४ महिने) या बाळाचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात देसवडे येथील संगीता फटांगरे (२८) या विवाहितेचा सोमवारी उष्माघाताने मृत्यू झाला. अकोल्यात उष्माघातामुळे एक अनोळखी वृद्ध व वाडेगाव येथे संजय महादेव लोखंडे यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
तिघांचा गुदमरून मृत्यू
लातूर जिल्ह्यात आलमला येथे विहिरीत उतरलेल्या सद्दाम फारुख मुलानी (२२), त्याचे वडील फारुख खुदबुदीन मुलानी (४६) व त्यांचा पुतण्या सईद दाऊद मुलानी (२६) यांचा जीव गुदमरला. त्यांना बाहेर काढण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.