कुपोषणमुक्तीत ८ नवे जिल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:19 AM2018-03-30T06:19:49+5:302018-03-30T06:19:49+5:30
राज्यातल्या अंगणवाड्यांतील दोन लाखांहून अधिक बालकांची कुपोषणातून मुक्तता करण्यासाठी रिलायन्स न्युट्रिशन
मुंबई : राज्यातल्या अंगणवाड्यांतील दोन लाखांहून अधिक बालकांची कुपोषणातून मुक्तता करण्यासाठी रिलायन्स न्युट्रिशन गार्डन्सच्या माध्यमातून महिला शासनाच्या बालविकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशनने २०१५ साली एक सामंजस्य करार केला होता. राजमाता जिजाऊ मदर-चाइल्ड हेल्थ न्युट्रिशन मिशन (राजमाता जिजाऊ माता-बालक आरोग्य आणि पोषण अभियान) अंतर्गत या कराराचे गुरुवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि रिलायन्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ कुमार यांच्या उपस्थितीत नूतनीकरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे केंद्र सरकारने बालकांसाठी २०१६ मध्ये केलेल्या राष्ट्रीय कृती आराखड्यातील शाश्वत विकास उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार आहे. या उद्दिष्टामध्ये आहारातील सुधारणांवर भर देण्यात आला आहे. रिलायन्स फाउंडेशन समूहांना लहान स्वयंपाकघर बांधण्यास किंवा परसात बाग/मळा म्हणजेच रिलायन्स न्युट्रिशन गार्डन (रिलायन्स पोषण मळा) फुलवण्यास साहाय्य करत आहे. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित करण्यात आलेले, अत्यल्प खर्च असलेले, सेंद्रिय मळे आहेत. यात देशभरातील शेतकरी कुटुंबांचा आरोग्य आणि पोषणस्तर वाढवण्याची क्षमता असलेल्या फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेऊ शकेल, अशी बहुस्तरीय पीक पद्धती स्वीकारण्यात आली आहे.
या भागीदारीच्या पहिल्या टप्प्यात पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, जळगाव, परभणी, उस्मानाबाद, वर्धा या आठ जिल्ह्यांत रिलायन्स न्युट्रिशन गार्डन्स स्थापन करण्यात आली आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अंगणवाड्यांच्या आवारात विकसित करण्यात आलेल्या ७ हजार ३०० न्युट्रिशन गार्डन्सच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक बालकांना ताजी फळे आणि भाज्यांचा पुरवठा करण्यात आला. हे मळे फुलवण्यासाठी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत सातत्य राखण्यासाठी साहाय्य करण्याच्या दृष्टीने रिलायन्सने ४५० तज्ज्ञ प्रशिक्षकही नेमले आहेत.