चिंता वाढली; काेराेनाच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात 8 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 06:49 AM2021-01-05T06:49:38+5:302021-01-05T06:50:19+5:30
Corona New Strain: दक्षतेचे आदेश; मुंबईचे पाच, तर पुणे, ठाणे, भाईंदर येथील प्रत्येकी एक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी आठ जणांमध्ये नव्या स्ट्रेनचे विषाणू सापडले आहेत. मुंबईत हॉस्पिटलमध्ये हे सर्व रुग्ण दाखल आहेत. यातील पाच रुग्ण मुंबईचे तर पुणे, मीरा-भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता ते म्हणाले, ज्या गतीने ब्रिटनमधून येणारी विमाने थांबविण्यात आली व आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले, त्यामुळे ही साथ आपण रोखू शकलो आहोत. जर आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय वेळीच घेतला नसता, तर महाराष्ट्रात दुसरी लाट भयंकर झाली असती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे बैठक घेऊन लसीकरणासंदर्भात आढावा घेतला. ब्रिटनहून आलेल्या आठ प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे. त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले.
‘दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा’
उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी
ठेवा. आरोग्य संस्थांमध्येच
लसीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण करण्यात आले.
संपर्कात आलेल्यांचा कसून शाेध सुरू
n नव्या कोरोना विषाणूची लागण झालेले आठही प्रवासी सध्या संस्थात्मक विलगीकरणात असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
n त्यांचा संपर्क कुणाकुणाशी आला, ते काटेकोरपणे शोधण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव
डॉ. प्रदीप व्यास यांनी बैठकीत दिली.
n तर नव्या स्ट्रेनचे सर्व रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले होते, त्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र त्यांना नवीन स्ट्रेन आढळलेला नाही. तरीदेखील त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेले नाही, असेही मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोविशिल्डचा डोस सरकारला २०० रुपयांत
अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्डने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत केंद्र सरकारसाठी २०० रुपये व खुल्या बाजारपेठेतील विक्रीसाठी हजार रुपये अशी निश्चित केल्याचे ‘सीरम’चे
अदर पूनावाला यांनी सांगितले.