धोका वाढला! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव; ८ जणांमध्ये आढळली लक्षणं
By कुणाल गवाणकर | Published: January 4, 2021 07:14 PM2021-01-04T19:14:16+5:302021-01-04T19:22:39+5:30
मुंबईतील ५, पुणे, ठाणे, मीरा-भाईंदरमधील प्रत्येकी एकाचा समावेश
मुंबई: ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
ब्रिटनहून परतलेल्या ८ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी ट्विट करून दिली. 'ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यात मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे,' अशी माहिती टोपेंनी दिली.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 4, 2021
गेल्या आठवड्यात देशातल्या सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली गेली. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणचा, वितरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. राज्यातील ८ जणांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती याच बैठकीतून समोर आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित महापालिकांचे आयुक्त आणि आरोग्य विभागाशी संवाद साधला आणि त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
CM Uddhav Thackeray today held a meeting to discuss the preparations on COVID vaccination in the state. In the same meeting, he also discussed the situation in state after eight persons were found positive for the new strain of coronavirus: Maharashtra Chief Minister's Office
— ANI (@ANI) January 4, 2021
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर आरोग्य विभागानं गेल्या काही दिवसांत तिथून परतलेल्यांचा शोध सुरू केला. त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं. पैकी ८ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
सध्याच्या घडीला भारत आणि ब्रिटन यांच्यातील विमान सेवा बंद आहे. डिसेंबरमध्ये मोदी सरकारनं हा निर्णय घेतला. ८ जानेवारीपासून दोन्ही देशातील विमान वाहतूक सुरू होईल. २३ जानेवारीपर्यंत दोन्ही देशांत दर आठवड्याला ३० विमानं ये-जा करतील.