आगामी दहा-पंधरा वर्षांत विडी उद्योग बंद पडेल; देशभरातील 80 लाख कामगार होतील बेरोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 02:46 PM2019-12-20T14:46:23+5:302019-12-20T14:48:33+5:30

सोलापुरात ३५ हजारांहून अधिक महिला विडी कामगार कार्यरत आहेत. येथील विडी उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

80 lakh workers will be unemployed across the country | आगामी दहा-पंधरा वर्षांत विडी उद्योग बंद पडेल; देशभरातील 80 लाख कामगार होतील बेरोजगार!

आगामी दहा-पंधरा वर्षांत विडी उद्योग बंद पडेल; देशभरातील 80 लाख कामगार होतील बेरोजगार!

Next

सोलापूर: विडी उद्योगावर शासनाची अशीच वक्रदृष्टी राहिल्यास पुढील दहा-पंधरा वर्षात विडी उद्योग हमखास बंद पडेल, अशी भीती विडी उद्योजकांना लागून आहे. त्यादृष्टीने उद्योगाची अधोगती सुरु झाली आहे. मागील दहा वर्षांत सोलापूर सह राज्यातील अनेक विडी कंपन्या बंद पडल्या आहेत. भविष्यात आणखीन काही कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे. हे असेच सुरू राहिल्यास विडी उद्योग संपुष्टात येईल आणि या उद्योगावर अवलंबून असलेले देशभरातील तब्बल ८० लाख विडी कामगार उघड्यावर पडतील आणि यांचे पुनर्वसन सरकार करणार का? असा सवाल विडी उत्पादक संघ तसेच कामगार संघटनांकडून वारंवार विचारला जात आहे.

देशभरात शेती आणि टेक्स्टाईल नंतर सर्वाधिक रोजगार विडी उद्योगातून मिळतो. विशेष म्हणजे हजारो कोटींचा महसूल देखील याच उद्योगातून जमा होतो. विडी उद्योगात प्रत्यक्षपणे तब्बल ८० लाखांहून अधिक कामगार काम करतात. यात ९० टक्के कामगार हे महिला आहेत. तसेच या उद्योगा संबंधित व्यवसायात तब्बल ६० लाखांहून अधिक शेतकरी, शेतमजूर तसेच इतर कामगार अवलंबून आहेत. जंगलातील तेंदुपत्ता तोड कामात तब्बल २३ लाख कामगार कार्यरत आहेत. तसेच तंबाखूची शेती करणाऱ्या व्यवसायात तब्बल ३५ लाख शेतकरी, शेतमजूर कार्यरत आहेत.

मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार तसेच इतर आदिवासी राज्यात तेंदूपत्ता आणि तंबाखूची उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या सर्व कामगारांना विडी उद्योजकांच्या माध्यमातून पेन्शन, विमा, बोनस तसेच पीएफ दिला जातो. इतर सामाजिक सुरक्षा देखील उद्योजकांच्या विशेष सेसमधून दिल्या जातात. विडी उद्योगावर अनेक जाचक अटी आहेत. या अटी शिथिल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. याकडे शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे या उद्योगावर मोठे धर्मसंकट कोसळले आहे.

राज्यात दोन लाख कामगारांचे काय होणार
राज्यातील दोन लाख विडी कामगार हे विडी उद्योगावर अवलंबून आहेत. दोन लाख कामगारांना रोज दोनवेळचे सुखाचे जेवण मिळत आहे. त्यांच्या कुटुंबाचा देखील यावर उदरनिर्वाह सुरु आहे. सोलापुरात ३५ हजारांहून अधिक महिला विडी कामगार कार्यरत आहेत. येथील विडी उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. अशात कामगारांच्या कामात आणि कामगार कपात होऊ लागली आहे.त्यामुळे बहुतांश कामगार दुसऱ्या उद्योगात रोजगाराचा पर्याय शोधत आहेत. काही महिला गारमेंट उद्योगात रोजगार शोधत आहेत. देशांच्या तुलनेत महाराष्ट्रात विडी उद्योजकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. त्यामुळे येथे विडी कारखाने बंद पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथील उद्योजकांच्या माहितीनुसार पुढील दहा पंधरा वर्षात राज्यातील सर्व विडी कारखाने बंद पडतील आणि दोन लाख कामगार बेरोजगार होतील, अशी चिंता येथील कारखानदार तसेच कामगारांना आहे.

पहिल्यापासून सरकार विडी उद्योगाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहत नाही. त्यामुळे हा उद्योग अडचणीत सापडला आहे. याबाबत आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.याचा काहीच उपयोग होईना. त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत. आमच्यातील काही उद्योजक दुसऱ्या उद्योगाकडे वळले आहेत. आणखीन काही उद्योजक विडी उद्योग बंद करुन दुसरा पर्याय शोधत आहेत. मालकांचे पुनर्वसन होईल पण विडी कामगारांचे काय. भविष्यात लाखो विडी कामगार उघड्यावर पडतील. - बाळासाहेब जगदाळे ( प्रवक्ता, जिल्हा विडी उत्पादक संघ, सोलापूर)

Web Title: 80 lakh workers will be unemployed across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.