वृक्षारोपणाचे ८० टक्के लक्ष्य पूर्ण, अल्पसंख्याक विभागाची आकडेवारी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:56 AM2018-08-04T01:56:29+5:302018-08-04T01:56:46+5:30
शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले
मुंबई : शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले असून त्यासाठी ६ लाख २९ हजार ३५१ लोकांनी सहभाग दर्शविल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात शैक्षणिक संस्थांना सांगितलेल्या १९ लाख ६० हजार ४९० झाडांपैकी १४ लाख ३६ हजार ८३९ रोपे लावण्यात यश मिळाले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांचा आढावा घेतला असता मुंबई आणि उपनगरांची कामगिरी अत्यंत कमी आहे. मुंबई उपनगरात ९९ टक्के वृक्षारोपण होऊनही शैक्षणिक संस्थांचा त्यातील सहभाग शून्य टक्के असल्याचे दिसले. मुंबईखालोखाल बीड आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचा सहभाग कमी आहे. तर नागपूर, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशीम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा सहभाग १०० टक्के आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही ६३.२७ % लक्ष्य पूर्ण करण्यात यश मिळविले आहे. औरंगाबाद, बीड, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, वाशीम या जिल्ह्यांनी आपले लक्ष्य १०० टक्के पूर्ण केले. तर ठाणे, रायगड, पुणे, परभणी, पालघर, नांदेड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, जालना, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांनी वृक्षारोपण लागवडीत शून्य सहभाग दर्शविला आहे.
अल्पसंख्याक विभागाची आकडेवारी शून्य
१३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमात शैक्षणिक संस्थांचा सहभाग ८० टक्के आहे. या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या दुसऱ्या विभागाचा संकेतस्थळावर सहभाग माहितीवरून शून्य असल्याचे दिसते. अल्पसंख्याक विभागाला वृक्षारोपणासाठी लक्ष्य ठरवून दिले होते. मात्र संकेतस्थळावरील माहितीनुसार या विभागाच्या वृक्षारोपणाची कोणत्याच जिल्हा, तालुक्याची माहिती उपलब्ध नाही. याबाबत वन व महसूल विभागाच्या मंत्रालयातील अधिकाºयांनी, विभागातून वृक्षारोपण झाले असले तरी त्याची माहिती तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले.