80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 11:36 AM2018-01-23T11:36:59+5:302018-01-23T11:37:40+5:30
सोमवारी एका 80 वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.
मुंबई- सोमवारी एका 80 वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी गेली अनेक दिवस मंत्रालयात चकरा मारल्या पण तरीही योग्य दाद मिळत नसल्याने हतबल शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील असं या वृद्ध शेतकऱ्याचं नाव असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं समजतं आहे.
धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. उपचार घेत असलेल्या धर्मा पाटील यांना धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल वगळता कुणीही भेटण्यासाठी गेलेलं नाही, किंवा त्यांची साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे. योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला.