८०० जागा वाढल्या; अध्यापक कुठे आहेत? ‘एमबीबीएस’साठी अध्यापकांचा शाेध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 10:16 AM2024-10-02T10:16:31+5:302024-10-02T10:16:44+5:30
उसनवारी तत्त्वावर घेतलेले अध्यापक कोर्टात जाण्याच्या भीतीने त्या ठिकाणी विभागाने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे.
- संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ८०० जागा वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, नवीन परवानगी मिळलेल्या आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकविण्यासाठी अध्यापक कुठून आणायचे हा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागाला पडला आहे.
यासाठी काही अध्यापकांच्या सेवा वर्ग करणे, तसेच काही अध्यापकांच्या नियमानुसार होत असणाऱ्या बदल्या आणि कंत्राटी पद्धतीने अध्यापक भरती या तिन्ही गोष्टींवर विभाग सध्या काम करत आहे. उसनवारी तत्त्वावर घेतलेले अध्यापक कोर्टात जाण्याच्या भीतीने त्या ठिकाणी विभागाने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे.
सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाची राज्यात २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शैक्षिणक विभागाने सोमवारी गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, भंडारा,
अंबरनाथ येथेही महाविद्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील
दाखविला आहे. त्यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला या महाविद्यालयांना परवानगी पत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत.
नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील इतर महाविद्यालयांतील प्राध्यापकांना दिला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार, एमबीबीएस अभ्याक्रमाच्या प्रथम वर्षाला शरीररचना शास्त्र, शरीरविज्ञान शास्त्र आणि जीवररसायन शास्त्र हे तीन विषय शिकविले जातात. त्याचप्रामणे जनऔषधवैदक शास्त्र विषयाचे लेक्चर घेतले जातात. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेत शरीर विच्छेदन शिकविले जाते. यासाठी या विषयातील अध्यापकांची पहिल्या वर्षासाठी गरज असते. वैद्यकीय शिक्षण विभागाने ही गरज ओळखून या विषयातील तज्ज्ञ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नेमणार आहेत.
नवीन महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी इमारती भाड्याने घेतल्या आहेत. अध्यापक वर्गासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी ज्या काही अध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत, काहींची सेवा वर्ग करण्यात आली आहे, तर काही प्रमाणात कंत्राटी स्वरूपात अध्यापक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवतेत तडजोड केली जाणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहोत.
- दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग