गणेशोत्सवासाठी सुटणार ८०५ बस
By admin | Published: August 27, 2016 04:21 AM2016-08-27T04:21:33+5:302016-08-27T04:21:33+5:30
कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता.
पंकज रोडेकर,
ठाणे- गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत त्यातील ८०५ एसटी बसेसचे बुकिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ४२७ बसेस या ग्रुपद्वारे बुक झाल्या आहेत. तसेच यंदा सुरू केलेल्या मोबाइल अॅपमुळे आॅनलॉईन बुकींगलाही चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी कोकणातील गुहाघर, दापोली, खेड, चिपळूण येथे जाणाऱ्या भक्तांकरिता यंदा एसटीच्या ठाणे विभागातील ८ डेपोमधून ८५० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या ८ डेपोतून ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
त्यामुळे या गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर संगणकाद्वारे उपलब्ध करून दिले . तसेच ४० दिवस अगोदर ग्रुपचे आरक्षण सुरू करून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्यास सांगितले होते. तसेच गावाहून परतताना काही गोंधळ होऊ नये म्हणून परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली असून परतीचा प्रवास हा १० ते १५ सप्टेंबरदरम्यान असणार आहे.
>सर्वाधिक गाड्या बोरिवली, ठाणे येथून
यंदा सर्वाधिक ३०० एसटी बसेस बोरीवली येथून सोडण्यात येणार आहेत. त्या पाठोपाठ २१९ ठाणे खोपट, विठ्ठलवाडी-१००, भांडूप -१००,कल्याण-४५, भाईंदर-४० आणि मुलूंड -२४ अशा ८५० गाड्यांचे नियोजन केले होते. त्यापैकी ८०५ गाड्यांचे बुकींग झाले असून यात ३७६ गाड्यांचे आॅनलाईन तर ४२७ गाड्यांचे ग्रुपद्वारे बुकींग झाले आहे.