राज्याच्या १८ जिल्ह्यांमधील ३ हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:15 AM2017-10-17T04:15:18+5:302017-10-17T04:16:09+5:30
राज्याच्या १८ जिल्ह्यांमधील ३ हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी ८१ टक्के मतदान झाले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या १८ जिल्ह्यांमधील ३ हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी ८१ टक्के मतदान झाले. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज सुमारे ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होते; परंतु काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तसेच विविध कारणांनी काही ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे आज ३ हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांतता व सुरळीतपणे पार पडली. सर्व ठिकाणी उद्या मतमोजणी होईल. आज ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मतदान झाले.