८४ व्हीआयपींच्या दिमतीला ८१२ पोलीस!
By admin | Published: May 13, 2014 04:01 AM2014-05-13T04:01:58+5:302014-05-13T04:01:58+5:30
: राज्यातील ८४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तब्बल ८१२ पोलीस अधिकार्यांचा फौजफाटा तैनात करण्यात असून,
मुंबई : राज्यातील ८४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तब्बल ८१२ पोलीस अधिकार्यांचा फौजफाटा तैनात करण्यात असून, त्यातील ६६ पोलीस कर्मचारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार धूर्वे यांना माहिती अधिकारान्वये मिळालेल्या कागदपत्रांतून ही बाब उघड झाली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांना ‘झेड -प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून, त्यात ५२ पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. शिवाय सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून, त्यात १४ पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. बारा व्हीआयपींना ‘झेड-प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्यपाल शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा समावेश आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ४६, अजित पवार यांच्यासाठी ३१, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी २५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही ‘झेड’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आ. प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, आमच्या कुटुंबाला इतक्या सुरक्षाव्यवस्थेची आवश्यकता नाही. हा एक प्रोटोकॉलचा भाग आहे. आम्ही काही इतक्या सुरक्षाव्यवस्थेची मागणी केलेली नाही. शिवाय मी स्वत: याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात अनावश्यक सुरक्षाव्यवस्था काढून टाकण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)