५६१ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:11 AM2018-05-28T05:11:35+5:302018-05-28T05:11:35+5:30
राज्यातील विविध ३१ जिल्ह्यांतील ५६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १७४ ग्रामपंचायतीमधील २३७ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिली.
मुंबई - राज्यातील विविध ३१ जिल्ह्यांतील ५६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १७४ ग्रामपंचायतीमधील २३७ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिली.
या निवडणुकांसाठी स. ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मात्र केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. पालघर, भंडारा व गोंदिया हे तीन जिल्हे वगळता, इतर सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी सोमवारी, २८ तारखेला होईल. पालघर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी ४ जून रोजी होईल.
जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
ठाणे ४(८), पालघर २(९), रायगड १५९(५), रत्नागिरी(१), सिंधुदुर्ग २, नाशिक २०(७), धुळे ७, जळगाव ७(५), अहमदनगर ७०(१२), नंदुरबार (२), पुणे ८० (१५), सोलापूर ३(२२), सातारा १५(४), सांगली ७१(५), कोल्हापूर ६२(११), औरंगाबाद ४(६), बीड २(१), नांदेड ३(६), उस्मानाबाद १(७), परभणी १(१), जालना (३), लातूर ४(३), हिंगोली (१), अमरावती (६), अकोला १(४), यवतमाळ २५(६), वाशीम (२), बुलडाणा (३), वर्धा १४(५), चंद्रपूर (२), भंडारा ४(१), गोंदिया (५) आणि गडचिरोली (६) एकूण ५६१(१७४). (कंसात पोटनिवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या)