राज्यात वर्षभरात ८२४ लाचखोर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:43 AM2018-12-09T04:43:22+5:302018-12-09T04:43:48+5:30
अपसंपदा जमविणारे ४४ भ्रष्ट अधिकारीही उजेडात : नागपूर, पुणे विभाग अव्वल
- नरेश डोंगरे
नागपूर : सरकारने लठ्ठ पगार आणि विविध सोयीसवलती उपलब्ध करून दिल्यानंतरही खाबुगिरीसाठी नागरिकांची अडवणूक करणाऱ्या राज्यातील ८२४ लाचखोरांविरुद्ध वर्षभरात कारवाई करण्यात आली. तसेच पदाचा दुरुपयोग करून अपसंपदा जमविणाºया ४४ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हे दाखल केले. अपसंपदा जमविल्याच्या आरोपावरून राज्यात सर्वाधिक १५ गुन्हे नागपूर विभागात दाखल झाली आहेत.
आज लाचलुचपत प्रतिबंधक दिन आहे. त्यानिमित्त राज्याचा अढावा घेतला असता सर्वोत्तम कामगिरी पुणे आणि नागपूर विभागाने बजावल्याचे स्पष्ट होते. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड अशा ८ ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. १ जानेवारीपासून आजपर्यंत सर्व युनिटच्या कामगिरींचा आढावा लक्षात घेता, एसीबीच्या पुणे युनिटने वर्षभरात लाचखोरांना जेरबंद करण्यासाठी १८० सापळे लावले तर, भ्रष्टाचाराचे ४ गुन्हे दाखल केले.
नागपूर एसीबी युनिटने ११९ सापळे लावले तर, १५ भ्रष्ट अधिकाºयांविरुद्ध गुन्हे दाखल केले. औरंगाबाद एसीबीने १०८ सापळे आणि ३ गुन्हे, नाशिकने १०२ सापळे आणि ७ गुन्हे, ठाणे ९७ सापळे आणि ४ गुन्हे, अमरावती ९६ सापळे आणि ३ गुन्हे, नांदेड ८३ सापळे आणि २ गुन्हे तसेच मुंबई एसीबी युनिटने ३९ सापळे लावून भ्रष्टाचाराचे ५ गुन्हे दाखल केले.
एसीबीने लावले ८२४ सापळे
शासकीय नोकरदारांविरुद्ध एसीबीने ८२४ सापळे लावले. पदाचा दुरुपयोग करून अमाप मालमत्ता जमविणाºया २१ तसेच विविध मार्गाने भ्रष्टाचार करणाºया २३ असे एकूण ४४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.