८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:11 AM2017-10-19T05:11:51+5:302017-10-19T05:12:05+5:30
महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटीस बजावल्या होत्या.
- पंकज रोडेकर
ठाणे : महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटीस बजावल्या होत्या. या प्रकरणाचा पसारा दिवसेंदिवस वाढत असल्याने, त्याचा तपास ओडिशा पोलीस दलाकडे देण्याबाबत ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पेट्रोल पंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सर कार्ड, मदर बोर्ड, कंट्रोल की, पॅड यामध्ये फेरफार करून, ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी १७ जून २०१७ रोजी डोंबिवलीत पहिली कारवाई करून, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात ठाणे पोलिसांनी छापे टाकले. याचदरम्यान, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्थान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई केली आहे. ती करताना, ठाणे पोलिसांनी आतापर्यंत ३२ जणांना अटक केली असून, या प्रकरणी मुख्य दोषारोपपत्रासह पुरवणी दोषारोपपत्रही न्यायालयात सादर केले आहे.
दरम्यान, ओडिशातून अटक केलेल्या खासगी तंत्रज्ञ डंबरूधर मोहंतो याच्या चौकशीत, ओडिशातील आणखी २२ पेट्रोल पंपांची माहिती पुढे आली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखेचे पथक सप्टेंबरमध्ये ओडिशा येथे गेले होते. ९ दिवसांनी परतताना गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत आणखी काही पंपांची माहिती पुढे आली. त्यानुसार, या पथकाने तब्बल ८६ पेट्रोल पंपांना पडताळणीसंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांनुसार, पंपधारक ठाणे पोलिसांना सहकार्य करीत आहेत. मात्र, दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने, ठाणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारीही हा तपास तेथील पोलीस दलाकडे सुपुर्द करून, महाराष्टÑातील पेट्रोल घोटाळ्याक डे गुन्हे शाखेला व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येईल, असा याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिवाळीनंतर तेथील तपास ओडिशा पोलीस दलाकडे सुपुर्द केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.