राज्यातील ८६ वरिष्ठ निरीक्षकांना बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:48 AM2018-06-10T05:48:21+5:302018-06-10T05:48:21+5:30
पोलीस दलात अडीच दशकांहून अधिक काळ सेवा बजाविल्यानंतरही सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर गेल्या वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बढतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे.
मुंबई - पोलीस दलात अडीच दशकांहून अधिक काळ सेवा बजाविल्यानंतरही सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर गेल्या वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बढतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. शुक्रवारी रात्री राज्यातील ८६ वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्त/ उपअधीक्षक अशी पदोन्नती दिली. तर ९६ सहायक आयुक्त दर्जाच्या बदल्या करण्यात आल्या. गृह विभागाने शुक्रवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी केले.
पोलीस दलातील निरीक्षकांच्या दरवर्षी साधारण दोन टप्प्यांत पदोन्नतीचे आदेश बजाविले जातात. मात्र गेल्या वर्षी बढती केल्यानंतर नवीन यादी काढण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यासाठी सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पात्र असलेले अनेक अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले तर अनेक जणांची काही महिने सेवा शिल्लक राहिलेली आहे. गृह विभागाच्या उदासीनतेमुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत होती. अखेर शुक्रवारी ८६ निरीक्षकांना बढत्या देण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक ३८ अधिकारी मुंबईतील असून यातील अनेकांना मुंबईअंतर्गत बढती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ९६ सहायक आयुक्त/ उपअधीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधितांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत.
मुंबईतील ३८ अधिकाऱ्यांना बढती
एसीपी म्हणून बढती दिलेल्या अधिकाºयांमध्ये सर्वाधिक ३८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई आयुक्तालयातील आहेत. तर ११ पुणे, ६ नवी मुंबई व ५ अधिकारी ठाणे आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत आहेत.