८७९६ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा
By admin | Published: June 7, 2014 10:22 PM2014-06-07T22:22:43+5:302014-06-07T22:54:27+5:30
आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.
वाशिम: बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला रोजगार देण्याबरोबरच राज्याचे उद्योग चक्र गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्यभरात ७३ हजार ८५५ भृखंडांचे वितरण केले असून त्यापैकी आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.
राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योगासारखे दुसरे सक्षम क्षेत्र नसल्याची शासनाला खात्री पटली आहे. म्हणूनच उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला भूखंड विकसित करुन त्याचे वितरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे निर्माण झाल्यास बेरोजगारांची संख्याही आपसूकच कमी होईल हा उद्देशही यामागे दडला आहे. ज्या विभागात मोठमोठे उद्योगधंदे आहेत, तेथे मोठया प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असल्याचे आकडेवारी सांगते. दुदैवाने विदर्भात एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांची मोठी फौज तयार होत आहे. २0१२ मध्ये अमरावती, विभागात केवळ १६७१ उद्योगघटक कार्यरत होते. २0१३ मध्ये हा आकडा १८१0 वर पोहचला तर नागपूर विभागात २0१२ मध्ये ३0२४ आणि २0१३ मध्ये ४१७१ उद्योग घटकांची संख्या होती.अमरावती विभागातील एमआयडीसी क्षेत्रात ४९१४ भुखंड विकसित असून ३६0७ भुखंड वितरीत झाले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक उद्योग घटक अर्थात ११ हजार ७२ आहेत. येथे १९ हजार ५२७ पैकी १७ हजार ३६८ भुखंड वितरीत झाले आहेत.
रोजगार निर्मितीत मात्र पूणे विभाग अव्वल आहे. ९ हजार १९८ उद्योग घटकातून तीन लाख ६३ हजार रोजगार निर्मिती झाल्याची साक्ष एमआयडीसी कार्यालयाची २0१३ मधील आकडेवारी देत आहे. अमरावती विभागातील उद्योगधंद्यांनी केवळ २३ हजार बेरोजगारांना रोजगार दिला आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रात इतर विभागाच्या तुलनेत अमरावती विभाग खूप मागास ठरत आहे.