९०० गृहप्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 04:46 AM2016-05-13T04:46:01+5:302016-05-13T04:46:01+5:30
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नऊशे गृहप्रकल्पात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंचयन) प्रकल्प राबविला जात आहे.
मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नऊशे गृहप्रकल्पात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंचयन) प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत होत आहे.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणात केवळ २४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू
आहे. औद्योगिक नगरीच्या
२२परिसरात नवीन होणाऱ्या बांधकामांना राज्य शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा प्रकल्प बंधनकारक केला आहे. त्यानुसार महापालिकेने एप्रिल २००५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली.
पावसाळ्यात गृहप्रकल्पांच्या छतावर पडणाऱ्या पाण्याची साठवणूक करणे. त्याचा पुनर्वापर करणे.
तसेच, पाण्याचे जमिनीत पुनर्भरण करणाऱ्या प्रकल्पांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्रोत्साहन म्हणून मिळकत करात १० टक्के सूटही देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात शहरातील नऊशे प्रकल्पांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत झाली असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
> फ्लश टँकमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या!
नाशिकच्या इंदिरानगरमधील हरिओम रेसिडेन्सी या सोसायटीने आगळी शक्कल लढवत पाण्याची बचत साधली आहे. या सोसायटीतील सदस्यांनी आपल्या शौचालयातील फ्लश टॅँकमध्ये चक्क पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या भरून ठेवण्याची क्लृप्ती लढवली असून, यामुळे या सोसायटीत दररोज तब्बल १८ हजार, तर महिन्याला ५ लाख ४० हजार लिटर पाण्याची बचत केली जात आहे. शौचालयातील फ्लश टॅँकमधून एकदा बटन दाबल्यानंतर पाच ते सात लिटर पाणी वाया जाते. यावर उपाय म्हणून भरत लोहार, सुनील मोरे व अन्य काही सदस्यांनी शौचालयाच्या फ्लश टॅँकमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या भरून ठेवण्याची कल्पना मांडली. त्याबरोबर सर्व फ्लॅटमधील फ्लश टॅँकमध्ये प्रत्येकी एक लिटरच्या दोन बाटल्या भरून ठेवण्यात आल्या. यामुळे फ्लश टॅँकची क्षमता दोन लिटरने कमी होऊन बटन दाबल्यानंतर एकावेळी तीन ते पाच लिटर पाणीच बाहेर पडू लागले. त्यामुळे आपोआपच दरवेळी दोन लिटर पाण्याची बचत होऊ लागली. या सोसायटीमध्ये एकूण २१६ फ्लॅट असून, प्रत्येक फ्लॅटमध्ये दोन शौचालये आहेत. एका फ्लॅटमध्ये किमान चार सदस्य निवास करतात, असे गृहित धरल्यास एका फ्लॅटद्वारे सुमारे ऐंशी लिटर, सोसायटीद्वारे १८ हजार लिटर पाण्याची दररोज, तर ५ लाख ४० हजार लिटर पाण्याची दरमहा बचत होऊ लागली.
> बजाज आॅटोकडून ७५ टक्के बचत
औरंगाबाद येथील वाळूजच्या बजाज आॅटोने पाण्याच्या वापरात लक्षणीय घट केली आहे. उत्पादनात सातत्याने वाढ होत असताना २०११-१२ च्या तुलनेत २०१५-१६ यावर्षी ७५ टक्के पाण्याची बचत करून बजाज आॅटोने मराठवाड्यातील उद्योगांसमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
२०११-१२ या वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये पाण्याचा वापर एकतृतीयांशपेक्षाही कमी झाला असल्याचे बजाज आॅटोचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) डी. एन. नार्वेकर यांनी सांगितले.
असे केले उपाय
पावसाच्या पाण्याचे फेरभरण करणारी यंत्रणा कंपनीत उभारण्यात आली. कंपनीत पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जात आहे.
वापरलेल्या शंभर टक्के पाण्यावर कंपनीतील ‘आरओ प्लँट’मध्ये प्रक्रिया करून कारखान्यातील विविध कामांसाठी त्याचा पुनर्वापर करण्यात आला.
सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर ‘टॉयलेट’ तसेच बगिच्यांसाठी केला जात आहे.
पाण्याच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पाण्याचा काटकसरीने वापर होतो की नाही, हे पाहण्यासाठी कंपनीत पाण्याचे मीटर बसविण्यात आले आहेत.
जमिनीखालील अशुद्ध पाण्याच्या पाईपलाईन तसेच फायर हायड्रंट लाईन्स गंजू नयेत तसेच त्यातून पाण्याची गळती होऊ नये, यासाठी या पाईपलाईन्स बदलून त्या जमिनीवरून टाकण्यात आल्या आहेत.
>>पाणीबचतीचा संकल्प
महाराष्ट्रात मराठवाड्यासोबतच विदर्भातदेखील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात तर पाणीसमस्या आणखी बिकट आहे. पाण्याची बचत व्हावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नक्कीच पुढाकार घेण्यात येत आहे. मागील वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यंदादेखील हे आयोजन करण्यात येणार असून पाणीबचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
- डॉ.सिद्धार्थ विनायक काणे, कुलगुरू,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ