घुमान रेल्वे प्रवासासाठी ९०० जागा शिल्लक
By admin | Published: February 13, 2015 01:51 AM2015-02-13T01:51:42+5:302015-02-13T01:51:42+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घुमान (पंजाब) येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणा-या साहित्यप्रेमींची
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घुमान (पंजाब) येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणा-या साहित्यप्रेमींची संख्या १ हजार ४०० पर्यंत गेली असून आणखी ९०० जागांची नोंदणी करण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे, अशी माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितली.
विशेष म्हणजे या संमेलनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे या संमेलनासाठी अनेक नामवंत नाटय-चित्रपट क्षेत्रातील सेलेब्रिटीजनीही सहभागी होण्याचे मान्य केले आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
संमेलनाला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाडयांसाठी प्रवास तसेच घुमानमध्ये निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी प्रतिनिधी शुल्क म्हणून ३ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. संमेलनासाठी दोन रेल्वे गाड्या अनुक्रमे मुंबईत वसईपासून तर दुसरी गाडी नाशिक रोड, नाशिक येथून १ एप्रिल रोजी सोडणार आहेत. या रेल्वे बोगींना दिवंगत साहित्यिकांची नावेही देणार असून त्या त्या बोग्यांमध्ये त्या साहित्यिकाने लिहिलेले साहित्यही ठेवण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनाचाच एक भाग म्हणून ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयातून दोन लाख कुटुंबांपर्यंत निमंत्रणे पाठविण्यात येत आहेत. तसेच राज्यातील सात हजार ग्रंथालयांना निमंत्रण पत्रेही दिली आहेत. (प्रतिनिधी)