डोंबिवलीला रंगणार ९०वे साहित्य संमेलन
By admin | Published: September 19, 2016 06:00 AM2016-09-19T06:00:04+5:302016-09-19T06:00:04+5:30
आगामी ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे.
पुणे : आगामी ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे. संमेलनस्थळ निश्चित करण्याबाबत रविवारी साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक झाली. त्यात आयोजनाचा मान डोंबिवलीच्या आगरी युथ फोरमला मिळाला आहे.
याबाबत निर्णय पुण्यात होऊनही अधिकृत घोषणा मात्र साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हेकेखोरपणामुळे २० सप्टेंबरला नागपूरलाच होणार आहे. संमेलनासाठी सातारा, चंद्रपूर, बेळगाव, कल्याण, डोंबिवली, रिद्धपूर येथून निमंत्रणे आली होती. महामंडळाने बेळगावचे सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीमधील आगरी युथ फोरम व कल्याणचे सार्वजनिक वाचनालय यांनी सुचविलेल्या स्थळांची पाहणी केली होती. बैठकीत अध्यक्षांसह काही सदस्यांचा बेळगावकडे अधिक कल होता तर काहींची डोंबिवलीला पसंती होती. अखेर डोंबिवलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कौतिकराव ठाले-पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>बैठकीचे पुण्यात का आयोजन?
साहित्य महामंडळाचे कार्यालय मसापमधून विदर्भ साहित्य संघाकडे गेल्यानंतर संमेलनाच्या स्थळ निश्चितीबाबतची बैठक नागपूरलाच होणे अपेक्षित होते. मात्र ही बैठक पुण्यात आयोजित करण्यामागचे कारण उलगडले नाही. तरीही, बैठक झालेल्या ठिकाणी निर्णय जाहीर करणे अपेक्षित होते.
मात्र महामंडळाचे अध्यक्ष
डॉ. जोशी यांनी शेवटपर्यंत निर्णयासंदर्भात मौन बाळगून नागपूरलाच अधिकृत घोषणा करण्याचा हेका कायम ठेवला.
>पुण्यात बैठक घेतली म्हणजे निर्णय येथेच जाहीर करायला पाहिजे, असे काही नाही. संमेलन स्थळ निवडीचा निर्णय २० सप्टेंबरला नागपूर येथे मी जाहीर करणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष,
साहित्य महामंडळ