९१वे मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात, विवेकानंद आश्रमाला यजमानपदाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 05:27 AM2017-09-11T05:27:29+5:302017-09-11T05:27:59+5:30
यंदाचे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी नागपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संमेलनाच्या यजमानपदाचा मान ‘विवेकानंद आश्रम’ या संस्थेला देत असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
नागपूर : यंदाचे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी नागपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संमेलनाच्या यजमानपदाचा मान ‘विवेकानंद आश्रम’ या संस्थेला देत असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
संमेलनस्थळाच्या पाहणी समितीने रविवारी सकाळी अहवाल सादर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले. महामंडळाच्या एकूण १९ सदस्यांपैकी १६ सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. तीन सदस्य अनुपस्थित होते. यातील सात मते बडोद्याला तर नऊ मते हिवरा आश्रमला मिळाली. अखेर बहुमताच्या आधारे संमेलन हिवरा आश्रमला देण्याचा निर्णय झाला, अशी माहिती डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिली.
या पत्रपरिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, उपाध्यक्ष सुधाकर भाले, कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे
व महामंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
या निर्णयामुळे सात वर्षांनंतर विदर्भाला पुन्हा संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. याआधी २०१२मध्ये ८५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळाने आयोजित केले होते.
संमेलनाध्यक्ष डिसेंबरमध्ये
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही या वेळी जाहीर करण्यात आला. १४ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी महामंडळाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ७ नंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. १० डिसेंबर रोजी नव्या संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल.