पंढरीच्या विकासासाठी ९२ कोटींचा आराखडा
By admin | Published: July 27, 2015 01:08 AM2015-07-27T01:08:44+5:302015-07-27T01:08:44+5:30
पंढरपूरसह चंद्रभागेच्या विकासासाठी ९२ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून शहरातील ‘ड्रेनेज सिस्टीम’ विकसित
पंढरपूर : पंढरपूरसह चंद्रभागेच्या विकासासाठी ९२ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून शहरातील ‘ड्रेनेज सिस्टीम’ विकसित करण्यात येईल. त्यामुळे पंढरीच्या स्वच्छतेवर कायमस्वरुपी तोडगा निघेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी विविध कामे केली जातील. त्याला निधीची पूर्तता करण्यास राज्य शासन सक्षम असून त्यासाठी केंद्राकडेही जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आषाढी एकादशीला होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री रविवारी सपत्नीक पंढरपुरात झाले.
ते म्हणाले की, वारीसाठी आता ६५ एकर जमिनीवर पालखी तळ उभे केले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी यापुढेही असे अनेक तळ विकसित केले जातील. सध्या ३५ एकर जमीन अधिगृहित करण्याची तयारी सुरु असून त्यासाठी नगरपरिषदेकडे निधी कमी पडत असेल तर तो निधी राज्य शासन देईल.
देवा एकदा तरी तुझ्या खऱ्या भक्ताला शासकीय पूजेचा मान दे, असे मी पांडुरंगाला यापूर्वी दर्शन घेताना म्हटलो होतो. आणि देवाने माझे म्हणणे यंदा ऐकले आहे. त्यामुळे ही पूजा करणे माझ्यासाठी अनपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
पंढरपूर आणि शिर्डी येथील मंदिर समितीच्या प्रमुखपदी आयएएस अधिकारी नेमावा, अशी मागणी आहे. पंढरपूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे तीर्थक्षेत्र विकासासाठी आयएएस अधिकारी देणे सध्या तरी शक्य नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)