बांधकाम हटवण्यासाठी ९२ पोलीस नियुक्त
By admin | Published: April 27, 2017 01:48 AM2017-04-27T01:48:55+5:302017-04-27T01:48:55+5:30
नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत.
मुंबई : नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी
राज्य सरकारला दिले आहेत. त्याचे पालन करत राज्य सरकारने ९२ पोलिसांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.
दिघ्यासह उर्वरित नवी मुंबईतील बांधकाम पाडण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी नवी मुंबईतील बांधकाम हटवण्यासाठी १०६ विशेष पोलिसांपैकी ९२ पोलिसांची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षणासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाला दिली.
तसेच नव्या धोरणाबाबत सांगताना सरकारी वकिलांनी एमआरटीपी कायद्यात सुधारणा करून नवी नियमावली करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशीही माहिती खंडपीठाला दिली. दिघ्यामधील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी राजीव मिश्रा व
मयूरी मारू यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी जून महिन्यात ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)