आधारकार्डच्या ९४०० छायांकित प्रती जप्त
By admin | Published: January 25, 2017 03:45 AM2017-01-25T03:45:36+5:302017-01-25T03:45:36+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाइलच्या सिम कार्डची विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या
ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाइलच्या सिम कार्डची विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ हजार ३४५ सिम कार्ड, ९४०० बनावट आधार कार्डांच्या छायांकित प्रति, कार्यरत नसलेले तीन हजार ३६० सिम कार्ड, दोन संगणक असा लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदारांची बनावट ओळखपत्रांच्या छायांकित प्रति मिळाल्याने, बोगस मतदानासाठी त्याचा उपयोग केला जाणार होता का? या दृष्टीनेही तपास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्रांचे स्कॅनिंग करून, ते संगणकामध्ये अॅडॉब फोटोशॉप सॉफ्टवेअरद्वारे मूळ कार्डधारकाचा फोटो आणि नाव पत्त्यामध्ये फेरफार करून, त्याच्या छायांकित (झेरॉक्स) प्रति काढून त्या बनावट कागदपत्रांद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक सिम कार्ड कार्यरत केल्याची माहिती, भिवंडी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. त्या आधारे, ९ नोव्हेंबर २०१६ रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात १० नोव्हेंबर रोजी कलीमुद्दीन खान , संदीपकुमार गुप्ता , अनिल सिंह , बंडू भाकरे आणि गणेश नेलवाडे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून बोगस नावाने तयार केलेले सिम कार्डसाठीचे अर्ज, बनावट आधार कार्ड आणि मोबाइल दुकानाच्या नावाचे ६० शिक्केही जप्त केले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड कार्यरत करणारा भिवंडीतील अश्रफी मोबाइलचा मालक सिराज अन्सारी याला ४७० सिम कार्ड ज्ञानप्रकाश गुप्ता यास विक्री करताना पकडले. (प्रतिनिधी)