९५२ किलो कांद्याची पट्टी १ रुपया!

By admin | Published: May 23, 2016 01:58 AM2016-05-23T01:58:54+5:302016-05-23T01:58:54+5:30

रात्रं-दिवस काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या अवहेलना होताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ९५२ किलो कांदा विकून फक्त १ रुपया हातात पडला आहे

9 52 kg of onion stripe 1 rupee! | ९५२ किलो कांद्याची पट्टी १ रुपया!

९५२ किलो कांद्याची पट्टी १ रुपया!

Next

पुणे / चाकण : रात्रं-दिवस काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या अवहेलना होताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ९५२ किलो कांदा विकून फक्त १ रुपया हातात पडला आहे. कांद्याची पट्टी पाहून हा बळीराजा कोसळून गेला असून, स्वत:च्या नशिबाला दोष देत आहे. आता शेतातील कांद्याला ‘कुणी भाव देता का भाव...’ असे म्हणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही.
मारुती परभाणे असे या शेतकऱ्याचे नाव. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई या गावात त्यांची शेती आहे. त्यांनी चार एकर शेतात कांद्याची लागवड केली आहे. त्यापैकी १० गुंठा शेतातून त्यांनी विक्रीसाठी कांदा काढला. त्यांनी एका टेम्पोमधून दि.१० मे रोजी गुलटेकडी मार्केट यार्डातील पल्लवी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे कांदा विक्रीसाठी पाठविला होता.
मध्यम प्रतीचा एकूण १८ गोणी कांदा होता. त्याचे एकूण वजन ९५२ किलो इतके भरले. या कांद्याला प्रति १० किलोस केवळ १६ रुपये भाव मिळाला. म्हणजेच प्रतिकिलोस १ रुपया ६० पैसे भावाने त्यांच्या कांद्याची विक्री झाली. या मालाची एकूण रक्कम १५२३ रुपये २० पैसे इतकी झाली. त्यामधून आडत ९१ रुपये ३५ पैसे, हमाली ५९ रुपये, भराई १८ रुपये ५५ पैसे, तोलाई ३३ रुपये ३० पैसे तर मोटारभाडे १३२० रुपये असा एकूण १५२२.२० रुपये पट्टीतून कपात करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती फक्त १ रुपया शिल्लक राहिला.
परभाणे याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा किंवा इतर शेतमालाच्या विक्रीतून केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
कांद्याला या आठवड्यात ४०० ते ७०० रुपये असा प्रतवारीनुसार भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक किंचित वाढली. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक २ हजार २०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढून भाव स्थिर राहिले. कांद्याचा कमाल भाव ७०० रुपयांवर स्थिरावला. सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्याला प्रति १० किलोसाठी ५० ते ९० रुपये भाव आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. ५० किलोची गोणी बाजारात पाठविण्यासाठी मोटारभाडे, आडत, हमाली, तोलाई आणि भराई या खचार्चा विचार करता किमान ८० ते ९० रुपये गोणीसाठी बाजारखर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० किलोच्या गोणीमागे १०० ते १५० रुपयेदेखील मिळत नाहीत. कांदा सुमार दर्जाचा असेल तर उत्पादन खर्चही निघत नसल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून सर्वत्रच कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पण सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथेकडे पाहायला वेळच नसल्याचे दिसते. (प्रतिनिधी)सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत नाही. परभाणे यांच्या कांद्याचा आकार लहान होता. त्यामुळे त्याला कमी भाव मिळाला. त्यांच्या गावापासून एका गोणीस ४० रुपये मोटार भाडे आहे. त्यानुसार १८ गोण्यांचे ७२० रुपये एवढेच भाडे होते. मात्र, हुंडेकरीने (मोटारचालक) पाठविलेल्या मेमोमध्ये अतिरिक्त ६०० रुपये लावण्यात आले आहेत. तसेच प्रत्यक्षात कांद्याला १५ रुपये प्रति दहा किलो असा भाव मिळाला होता. त्यामुळे त्यांची पट्टी येणे होत होती. हे पाहून १६ रुपये भाव करण्यात आला.
- सुधीर जाधव, आडतदार

Web Title: 9 52 kg of onion stripe 1 rupee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.