मीरा-भार्इंदरमध्ये ९७ कुपोषित बालके
By admin | Published: July 15, 2017 03:17 AM2017-07-15T03:17:54+5:302017-07-15T03:17:54+5:30
बालवाड्यांतील मुलांच्या तपासणीत तब्बल ३४ तीव्र व ६३ मध्यम गटातील अशी मिळून ९७ कुपोषित बालके आढळली आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील अंगणवाडी, बालवाड्यांतील मुलांच्या तपासणीत तब्बल ३४ तीव्र व ६३ मध्यम गटातील अशी मिळून ९७ कुपोषित बालके आढळली आहेत. त्यांच्यावर उपचार, मार्गदर्शनासाठी शहरात पोषण पुनर्वसन केंद्रच नसल्याने कुपोषणग्रस्त बालकांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये शहरी भागातील ४२ व ग्रामीण भागातील ३९ अंगणवाड्या आहेत. तर, महापालिकेच्या बालवाड्यांची संख्या २६ आहे. या अंगण व बालवाड्यांमध्ये ८ हजार ३४३ मुले आहेत. अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना तसेच स्तनदा मातांना एकात्मिक बालविकास प्रकल्प माध्यमातून सकस आहाराचा पुरवठा व्हायला हवा. यात लापशी, खिचडी, पुलाव, चण्याची उसळ, गूळ, कुरमुरा लाडू, भेळेचा समावेश आहे. ही कामे महिला बचत गटांना देण्यात आली आहेत. सकस आहारासाठी सरकारी तिजोरीतून लाखोंचा खर्च दाखवला जातो. प्रत्यक्षात सकस आहार पुरवला जात नसल्याची ओरड सतत होते. गूळ-शेंगदाणा लाडू तर आता बंदच झाला आहे.
बालवाड्यांतही निकृष्ट खाऊ पुरवल्याची प्रकरणे यापूर्वीच उघड झाली होती. अंगणवाडी व बालवाड्यांमधील सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची वर्षातून दोनदा वैद्यकीय तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये मागील दोन महिन्यांत तब्बल ३४ तीव्र कुपोषणग्रस्त, तर ६३ मध्यम कुपोषणग्रस्त बालके आढळली आहेत. त्यांना व त्यांच्या मातांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे आवश्यक आहे. परंतु, मीरा-भार्इंदरमध्ये असे केंद्रच नाही. पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातच दोन कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची संकल्पना आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मांडली होती. परंतु, सहा महिने उलटूनही पालिका केंद्र सुरू करू शकलेली नाही.
>केंद्र रखडले
पालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र तयार केले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता होताच हे केंद्र सुरू होणार आहे. मीरा-भार्इंदरमधीलच नव्हे तर ठाणे, पालघर जिल्ह्यांतील कुपोषणग्रस्त बालकांना सकस आहारासह मार्गदर्शन व उपचार मिळणार आहे, असे डॉ. अंजली पाटील म्हणाल्या.