बलुतेदार संस्थांना ९८ कोटींची कर्जमाफी
By admin | Published: February 14, 2016 12:25 AM2016-02-14T00:25:18+5:302016-02-14T00:25:18+5:30
खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कार्यरत बलुतेदार तथा ग्रामोद्योग सहकारी संस्थांना ९८ कोटी ५९ लाख ८० हजार एवढ्या कर्जाची शासनाने माफी दिली आहे.
यवतमाळ : खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कार्यरत बलुतेदार तथा ग्रामोद्योग सहकारी संस्थांना ९८ कोटी ५९ लाख ८० हजार एवढ्या कर्जाची शासनाने माफी दिली आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यात सर्वच जिल्ह्यात तालुकास्तरावर बलुतेदार संस्था कार्यरत आहेत. कारागीर हमी योजनेंतर्गत त्यांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात आले होते. मात्र व्यवसाय डबघाईस आल्याने त्यांचे हे कर्ज प्रलंबित राहिले. ३११ बलुतेदार संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत झालेल्या कर्ज व व्याजाला माफी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर ३१ मार्च २००८ अखेरपर्यंतच्या कर्ज व व्याज अशा ९८ कोटी ५९ लाखांच्या रकमेला माफी देण्यात आली. त्यामध्ये ५१ कोटी ७४ लाख मुद्दल व ४६ कोटी ८४ लाखाच्या व्याजाचा समावेश आहे. राज्यातील बलुतेदार संस्थांच्या ८३ हजार ९८१ सभासदांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाने ८ फेब्रुवारी २०१६ रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहे.
संपूर्ण कर्जमाफीची मागणी
कर्जाचे संपूर्ण व्याज माफ न झाल्याने बलुतेदार सभासदांचा सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. २००८नंतर बहुतांश कर्जवाटप झाले नसले तरी त्यावरील व्याज मात्र आजही सुरू आहे. २००८नंतरचे व्याजही शासनाने माफ करून सातबारा कोरा करावा, अशी बलुतेदार तथा ग्रामीण कारागीर संस्थांची मागणी आहे. (प्रतिनिधी)