अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:59 AM2017-10-12T03:59:19+5:302017-10-12T03:59:53+5:30

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे.

9 arrested for using unauthorized exchange for terrorists; | अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा

अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा

Next

ठाणे : भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत दहशतवादी कारवायांमुळे मुंब्रा हे देशभरातील तपास यंत्रणांच्या रडारवर होते. मात्र, यापुढे भिवंडीचेही नाव त्या यादीत जोडले गेले आहे.
सिम बॉक्सच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल्स राउट करून संबंधित व्यक्तीला जोडणा-या अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलिसांनी जवळपास १५ दिवस या प्रकरणाची तांत्रिक माहिती मिळवली. त्यानंतर, मंगळवारी एकाच वेळी भिवंडीत ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यासाठी १० अधिकारी आणि ८० पोलीस कर्मचाºयांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या कारवाईमध्ये ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ३० आरोपींवर पोलिसांना संशय आहे. ९ पैकी ८ आरोपी पाचवी ते बारावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे २१ लाख ६१ हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.
नियाज अहमद मोहम्मद इब्राहिम शेख, मोहम्मद शाकीर इर्शाद अहमद मोमीन, नदीम अली शेर अली शेख, मोहम्मद उमर अजिजुर्रहेमान खान, मोहम्मद अर्शद मुमताज अहमद शेख, मोहम्मद फुजैल एजाज अहमद शेख, शमशाद अहमद इसामुद्दीन अन्सारी, फक्रेआलम मोहम्मद शाहजहान शेख आणि मोहम्मद आलिम बद्रिजमा शेख ही आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी भिवंडी येथे राहणारे असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. या धंद्यातून त्यांना महिनाकाठी प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमध्ये जगजितसिंग गरेवाल आणि मोहन भानुशाली या खासगी तंत्रज्ञांची मोठी मदत झाली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
भिवंडी येथे मे २०१७ मध्ये अशाच प्रकारची कारवाई पोलिसांनी केली होती. त्या वेळी २२ सिम बॉक्सेस आणि ४२० सिम कार्ड्स जप्त करण्यात आली होती.
अनधिकृत एक्स्चेंजचे जाळे देशभरात पसरले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. भिवंडीमध्ये सुरू असलेला गोरखधंदा हिमनगाचे केवळ टोक आहे. देशभरातील मोठमोठ्या शहरांमध्ये हा उद्योग सुरू असून, त्याविषयीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या अनुषंगाने लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
महसूलचे नुकसान-
परदेशातून आलेल्या कॉल्सवर सुरक्षा यंत्रणांची नजर असते. या कॉल्सची नोंद संबंधित मोबाइल कंपनीसह दूरसंचार यंत्रणेकडेही होत असते. परदेशातील कॉल्स भारतात येण्यासाठी आंतरराष्ट्रीय ‘गेट-वे’ असतो. त्यापोटी विशिष्ट कर भरावा लागतो.
अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमार्फत राउट झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉल्सची कुठेही नोंद तर होतच नाही, शिवाय त्यामुळे महसूलचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.
दूरसंचार यंत्रणेकडे नोंदच नाही-
या कारवाईत २५ सिम बॉक्स जप्त केले. त्यामध्ये रिलायन्स, एअरटेल, बीएसएनएल, टेलिनॉर आणि आयडियाचे ४३८ सिम कार्ड्स होते.
या सिम बॉक्सेसला राउटरमार्फत इंटरनेटजोडणी दिली होती. या यंत्रणेच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल्स विनापरवाना राउट करून संबंधित व्यक्तीच्या मोबाइल फोन किंवा लँडलाइन फोनला जोडले जातात.

Web Title: 9 arrested for using unauthorized exchange for terrorists;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.