बाप्पाला निरोप देताना ९ भक्तांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:51 AM2021-09-21T11:51:10+5:302021-09-21T11:52:53+5:30
मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. काही जण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले.
मुंबई : रविवारी राज्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या ९ जणांचा मृत्यू झाला. यापैकी तिघे जण मुंबईत, पुणे व सोलापुरात प्रत्येकी दोघे, एक जण धुळ्यात तर एक जण बुलडाणा जिल्ह्यातील घटनेत बुडाला.
मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. काही जण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले. याच दरम्यान पाच जण समुद्रात बुडाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना वाचविण्यात यश आले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. शुभम राजनलाल निर्मल (१८), संजय हिरामन तावडे (२०) या तरुणांंचे मृतदेह पथकाच्या हाती लागले.
चारबंगला परिसरात राहणारे हिरामन तावड़े (५२) पूर्वी वर्सोवा गावात राहण्यास होते. नुकतेच ते चारबंगला परिसरात शिफ्ट झाले. ते वर्सोवा गावातच कामगार म्हणून काम करतात. ते भाऊ तावड़े म्हणून परिसरात ओळखीचे आहेत. रविवारी बाप्पाच्या विसर्जना दरम्यान बुडालेल्यामध्ये त्यांचा मुलगाही असल्याचे समजताच त्यांनीही समुद्रात उड़ी घेतली.
ते बुडत असल्याचे लक्षात येताच राकेश सुकाचा आणि सुभाष शिपे याांनी वाचवले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांचा मुलगा संजय याचा मृतदेह मिळून आला आहे. तावड़े कुटुुंबियांना धक्का बसला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून राज्यात अन्य ठिकाणीही विसर्जनाच्यावेळी बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.