मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:49 PM2021-11-01T20:49:11+5:302021-11-01T20:49:44+5:30
लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथके नियुक्ती केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये ६ लाख २ हजार ७०३ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ३ लाख २७ हजार २०१ लाभार्थ्यांना दोन डोस देण्यात आले आहेत . अश्या प्रकारे एकूण ९ लाख ३० हजार लस देण्यात आल्या आहेत . तर लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथके नियुक्ती केली आहेत .
महापालिकेने सोमवारी दिलेल्या माहिती नुसार , मीरा भाईंदर शहरातील शासकीय व खाजगी कोविड लसीकरण केंद्रामार्फत आतापर्यंत ६ लाख २ हजार ७०३ लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे . तर ३ लाख २७ हजार २०१ लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे महानगरपालिका दैनंदिन नियोजन करत आहे . नागरीकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या हेतूने शहरात संबंधित आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे . या शिवाय प्रमुख सार्वजनिक ठिकाणे , नाके येथे लसीकरण शिबिरे उभारली आहेत.
नागरिकांशी थेट घरोघरी जाऊन लसीकरण बाबत संवाद साधला जात आहे. लसीकरण विषयी असलेला मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न तसेच संवाद, प्रबोधन, लोकशिक्षण या माध्यमाचा वापर करून वंचित नागरीकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे. मोबाईल लसीकरण वॅनच्या टिममार्फत दुकाने, हॉटेल, मॉल, कॉल सेंटर, बँक, ई. आस्थापनांमधील नागरीकांच्या लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेऊन लसीकरणापासुन वंचित असलेल्या लाभार्थ्यांचे तात्काळ लसीकरण केले जात आहे.