नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, ‘डीआरआय’ची कारवाई; कॉँग्रेस पदाधिका-यासह बिल्डरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 03:40 AM2017-10-09T03:40:54+5:302017-10-09T03:41:26+5:30
भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपयांच्या तब्बल नऊ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या असून या प्रकरणी पश्चिम उपनगरातील कॉँग्रेसचा
मुंबई : भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपयांच्या तब्बल नऊ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या असून या प्रकरणी पश्चिम उपनगरातील कॉँग्रेसचा एक पदाधिकारी हाजी इम्रान शेख, बिल्डर हालीमचंदानी व झाहीद शेख अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी दिली.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला ५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नव्याने बाजारात आणलेल्या दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा समाजकंटकांनी बाजारात आणल्या आहेत. त्याविरुद्ध पोलिसांबरोबरच महसूल संचालनालयाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) येथील मॅकडोनाल्डच्या परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाºयांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. झडतीमध्ये त्यांच्याकडील बॅगेत पाचशे रुपयांच्या ९ लाख किमतीच्या बनावट नोटा मिळून आल्या. या तिघांनी या नोटा कोठून मिळविल्या, या रॅकेटमध्ये आणखी कोण आहेत, याचा तपास करण्यात येत असल्याचे ‘डीआरआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
हाजी इम्रान शेख हा कॉँग्रेसच्या ब्लॉक कमिटीचा जनरल सेके्रटरी आहे तर हालीमचंदानी हा बांधकाम व्यावसायिक असून त्याची उपनगरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. झाहीद शेख बनावट नोटा खपविण्यासाठी त्यांना सहकार्य करीत होता, असे सांगण्यात आले. हालीमचंदानी याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
महिन्याभरातील ‘डीआरआय’ची ही तिसरी कारवाई असून आतापर्यंत २४ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले. पहिल्या दोन कारवाईमध्ये दोन हजार रुपयांच्या प्रत्येकी साडेसात लाखांच्या नोटा पकडण्यात आल्या होत्या.