कुलगुरू निवडीसाठी ९१ लाखांच्या जाहिराती

By admin | Published: February 4, 2015 01:04 AM2015-02-04T01:04:14+5:302015-02-04T01:04:14+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. प्रादेशिक व राष्ट्रीय प्रसार

9 lakhs of advertisements for the election of Vice-Chancellor | कुलगुरू निवडीसाठी ९१ लाखांच्या जाहिराती

कुलगुरू निवडीसाठी ९१ लाखांच्या जाहिराती

Next

एकूण खर्च कोटीच्यावर जाणार : पाच वर्षांचे वेतन ९० लाख
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. प्रादेशिक व राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये करण्यात आलेल्या जाहिरातींचा खर्च सुमारे ९१ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील वेळी संपूर्ण प्रक्रियेचा खर्च ५ लाखांच्या जवळपास होता. यंदा इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज का पडली, यासंदर्भात विद्यापीठ वर्तुळात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पाच वर्षांचा कुलगुरूच्या वेतनाचा खर्च ९० लाख रुपये अपेक्षित आहे. मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत जाहिरातींचा खर्च अधिक झाल्याने नवे कुलगुरू खऱ्या अर्थाने लाखमोलाचे ठरणार आहेत!
डॉ. विलास सपकाळ यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिल्यापासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा आहे. २५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. शंभरावा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. विनायक देशपांडे यांना देण्यात आली. त्यानंतर कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याकडे विद्यापीठाचे लक्ष लागले होते. १२ जानेवारी कुलगुरूपदाच्या रिक्त जागेसाठी शोध समितीकडून जाहिरात जारी करण्यात आली. ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले.
काय करीत होते अधिकारी?
नागपूर विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांना जाहिरातींवर इतका मोठा खर्च होत आहे याची सुरुवातीला माहितीच नव्हती. परंतु ज्यावेळी इतक्या प्रमाणात जाहिराती छापून आल्या आहेत हे लक्षात आले तोपर्यंत उशीर झाला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजभवनात या मुद्याची माहिती दिली. विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखतीसाठी अर्ज करण्याची संधी देशभरातील विद्यापीठातील पात्र उमेदवारांना मिळणे अपेक्षित असते. परंतु त्यासाठी रोजगाराची माहिती देणारी राष्ट्रीय प्रकाशने उपलब्ध आहे. असे असताना प्रादेशिक स्तरावर जाहिराती देण्यामागचे कारण काय, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठाचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’
९१ लाख रुपयांच्या जाहिरातींसंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अद्याप याची देयके विद्यापीठाला मिळालेली नाहीत. त्यामुळे नेमका खर्च किती आला याबाबत आताच सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रक्कम बरीच मोठी असल्यामुळे देयके आल्यानंतर मंजुरीसाठी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडावे लागतील, असे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. पूरण मेश्राम यांनी स्पष्ट केले.
शोध समितीच्या बैठकीनंतर कुलगुरूपदासाठी जाहिरात देण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध प्रसार माध्यमांतून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच राष्ट्रीय स्तरावर जाहिरात देण्यात आली. चकित करणारी बाब म्हणजे अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक माध्यमांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. साहजिकच यामुळे जाहिरातींचा खर्च वाढला. निवड प्रक्रियेवरच मागील वेळेच्या तुलनेत सुमारे १८ पटींनी खर्च वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा संपूर्ण खर्च नागपूर विद्यापीठाला उचलावा लागणार आहे.

Web Title: 9 lakhs of advertisements for the election of Vice-Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.