झोपा काढणारे ९ जण निलंबित
By admin | Published: April 3, 2017 01:12 AM2017-04-03T01:12:06+5:302017-04-03T01:12:06+5:30
बसच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रात्रपाळीवर नियुक्त असलेले नऊ कर्मचारी झोपा काढताना आढळून आले
पुणे : बसच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रात्रपाळीवर नियुक्त असलेले नऊ कर्मचारी झोपा काढताना आढळून आले आहेत. ही ‘डुलकी’ त्यांना चांगलीच महागात पडली असून, नऊही जणांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) निलंबित केले आहे.
‘पीएमपी’च्या कामामध्ये शिस्त आणण्यासाठी नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कामावर वेळेत न आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचे एकदिवसाचे वेतन न देण्याचा निर्णय घेतला. आता कामाच्या वेळी झोपा काढणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात मुंढे यांच्या शिस्तीची जोरदार चर्चा सुरू आहे.
रात्रीच्या वेळी आगारांमध्ये बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते. मुंढे यांनी सर्व १३ आगारांमध्ये रात्रीच्या वेळी तपासणी करून कामाच्या वेळेत झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी चार कर्मचाऱ्यांचे पथकही नेमण्यात आले आहे.
या पथकाने शनिवारी रात्री तपासणी केल्यानंतर, पुणे स्टेशन व कोथरूड आगारमध्ये नऊ कर्मचारी झोपलेले आढळले. त्यामध्ये वर्कशॉपमधील ७ कर्मचारी आणि २ बसचालकांचा समावेश आहे. त्यापैकी चार कोथरूड, तर पाच जण पुणे स्टेशन आगारातील आहेत. कामात हलगर्जीपणा केल्याचा
ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
।कार्यालयातील चालक, वाहक रस्त्यावर
चालक व वाहक म्हणून पीएमपीमध्ये रुजू झालेले ७१ जण मागील
काही वर्षांपासून विविध आगारांसह मुख्य कार्यालयात प्रशासकीय
काम करीत होते. त्या सर्वांना पुन्हा मार्गावर आणण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे.
त्यांची नियुक्ती पुन्हा मूळ पदावर करण्यात आली असून, रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागातून न सोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.