स्वाइन फ्लूचे ९ बळी, १३५ जणांना लागण
By admin | Published: June 28, 2017 03:22 AM2017-06-28T03:22:15+5:302017-06-28T03:22:15+5:30
कधी उकाडा तर कधी गारवा अशाप्रकारे वातावरण सतत बदलत असल्याने मागील तेरा दिवसात ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच
पंकज रोडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कधी उकाडा तर कधी गारवा अशाप्रकारे वातावरण सतत बदलत असल्याने मागील तेरा दिवसात ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच जण दगावले असून तब्बल ८४ रुग्ण वाढले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात नऊ जण दगावले असून त्यातील सहा रुग्ण ठाणे पालिकेच्या हद्दीतील आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीला १३५ जणांना स्वाइनची लागण झाली असून त्यातील १०६ रुग्ण ठाणे शहरातील आहेत. ठाण्यातील स्वाइनचे रुग्ण हे प्रामुख्याने उच्चभ्रू वस्तीतील आहेत. याचदरम्यान, गेल्या सहा महिन्यात जिल्हाभरातून स्वाइन फ्लूच्या संशयित ९२ हजार ७१० रुग्णांची तपासणी केली आहे. यातील १० हजार ६९ रुग्णांची गत १३ दिवसात तपासणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी असा असून या जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी विशेष कक्ष स्थापन केलेले आहेत.
तर त्या-त्या रुग्णालयात स्कॅनिंग सेंटर उभारलेले आहेत. याचदरम्यान, १ जानेवारी ते २४ जूनदरम्यान या आजारासंदर्भात एकूण ९२ हजार ७१० जणांची तपासणी केलेली आहे. त्यामध्ये १६० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १३५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ६५ जण अजूनही उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाण्यात- ६, मीरा-भार्इंदर -२, आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील एकाचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील सहा पैकी चार महापालिकेत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. या काळात उल्हासनगर आणि भिवंडी या दोन्ही महापालिकेच्या हद्दीत अद्याप एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही.
उल्हासनगरात एक संशयित पुढे आला होता. पण, त्याला स्वाइन फ्लू झाला नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. तर नवी मुंबईत आतापर्यंत ३ संशयित आढळले असून त्यातील दोघाना घरी सोडण्यात आले असून एकावर उपचार सुरू आहेत.