चोवीस तासांत स्वाइन फ्लूचे ९ बळी
By admin | Published: March 5, 2015 01:28 AM2015-03-05T01:28:47+5:302015-03-05T01:28:47+5:30
राज्यातील स्वाइन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत या आजाराने ९ जिल्ह्यांत ९ जणांचा बळी घेतला.
पुणे : राज्यातील स्वाइन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत या आजाराने ९ जिल्ह्यांत ९ जणांचा बळी घेतला. यामुळे या वर्षातील बळींची संख्या १७०वर पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १०६ नवे रुग्ण सापडले. ४१ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
राज्यभरातील २० हजार नागरिकांची मंगळवारी स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. त्यातील १०६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लागण झालेल्यांची संख्या २ हजार ५ वर पोहोचली आहे. यापैकी ९ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. यामध्ये नागपूर शहर व जिल्हा, पुणे, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, मुंबई, कोल्हापूर आणि धुळे या जिल्ह्यांमधील प्रत्येकी एकाचा स्वाइन फ्लूमुळे बळी गेला. दरम्यान उद्या होळी असल्याने स्वाइन फ्लूची भिती व्यक्त होत आहे.
स्वाइन फ्लूचा लेखाजोखा
च्१ जानेवारीपासून आतापर्यंत १ लाख ८५ हजार १२३ जणांची तपासणी
च्१९ हजार ७०७ जणांना टॅमीफ्लू औषधे दिली
च्२ हजार ५ जणांना लागण
च्१७० जणांचा मृत्यू
च्इतर राज्यातील १५ जणांचा महाराष्ट्रात मृत्यू
च्१ हजार ४२५ जणांवर यशस्वी उपचार
केंद्राकडून राज्याला ३ हजार त्रिगुणा लसी
स्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना आजाराची लागण होऊ नये, म्हणून त्यांना प्रतिबंधक त्रिगुणा लस देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रशासनाने बुधवारी राज्याला ३ हजार त्रिगुणा लसीचा पुरवठा केला. राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध झालेली ही लस रुग्णालयांच्या आयासोलेशन वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र (आयसोलेशन) वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. स्वाइन फ्लू संसर्गजन्य असल्याने या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना त्याची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या आरोग्य विभागातर्फे केंद्राकडे १२ हजार लसींची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार लसी केंद्राने राज्याकडे पाठवून दिल्या आहेत. त्रिगुणा लस एच १ एन १ या विषाणूंसह आणखी दोन आजारांच्या विषाणूंनाही रोखणारी आहे. ही लस शासकीय रुग्णालयांमध्ये आयासोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिकांना देण्यात येणार आहे.
रुग्णांसाठी घरोघरी शोधमोहीम
सचिन राऊत ल्ल अकोला
‘स्वाइन फ्लू’च्या वाढत्या प्रभावाने राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा हादरली असून आजाराचे संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
राज्यातील ८ ते ९ जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ चा उद्रेक झाला असून, नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पुणे, पुणे ग्रामीण, नाशिक, सोलापूर, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, लातूर,अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत.
२८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपीट ‘स्वाइन फ्लू’च्या उद्रेकाला दुर्दैवाने आणखी पोषक ठरला. आजाराचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक शहर व ग्रामीण भागात घरोघरी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर औषधोपचारही करण्यात येतील.
जिल्हा मृत्यू
नागपूर ४६
पुणे-पिंपरी ३६
मुंबई ०३
ठाणे ०७
लातूर ०८
नाशिक ०८
अमरावती ०२
अकोला ०२
(२८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतचे बळी)