२२ महिन्यांत ९ वाघांची शिकार; राज्यातील धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:32 AM2018-12-09T04:32:01+5:302018-12-09T06:43:52+5:30
महाराष्ट्रात गेल्या २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे ही विदर्भातील आहे.
नागपूर : अवनी वाघिणीच्यामृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे ही विदर्भातील आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला, यातील शिकारीची प्रकरणे किती होती, आरोपींविरोधात काय कारवाई झाली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते २० ऑक्टोबर २०१८ या कालावधीत महाराष्ट्रात एकूण ३२ वाघांचे मृत्यू झाले. यातील २२ मृत्यू हे नैसर्गिक होते. १ मृत्यू हा अपघाताने झाला होता. नऊ वाघांची चक्क शिकार करण्यात आली. यात सहा वाघ तर तीन वाघिणींचा समावेश होता. सर्व नऊ वाघांची शिकार २०१७ मध्ये करण्यात आली. शिवाय या घटना नागपूर, चंद्रपूर, वर्धा किंवा गडचिरोली जिल्ह्यातच झाल्या आहेत. सर्वात जास्त तीन शिकारी नागपूर जिल्ह्यात झाल्या. सहा वाघांची विद्युतप्रवाहाद्वारे शिकार करण्यात आली तर तीन वाघांची विषप्रयोग करुन शिकार झाली. २०१८ मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकाही वाघाची शिकार झाली नाही.
२०१७ मध्ये होते १७१ वाघ
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात ‘कॅमेरा ट्रॅप’ पद्धतीनुसार २०१५ मध्ये १३९ वाघ होते. २०१६ मध्ये हाच आकडा १५८ होता तर २०१७ मध्ये १७१ वाघांची नोंद झाली होती. सर्वाधिक ६९ वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होते, तर मेळघाटमध्ये ४१ वाघ होते. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या ४४ इतकी होती.
एनटीसीएचा अहवाल पूर्वग्रह दूषित : किशोर तिवारी
अवनीची शिकार करताना कायद्याचे उल्लंघन झाले, असा अहवाल राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) चौकशी समितीने दिला. मात्र हा अहवाल पूर्वग्रह दूषित असल्याची टीका शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.
हा अहवाल राज्य शासनाला सादर होण्यापूर्वीच मनेका गांधी, दिल्ली, मुंबईत बसून मीडिया ट्रायल करणाऱ्या तथाकथित वन्यजीवप्रेमींना कसा मिळाला, असा प्रश्नही तवारी यांनी उपस्थित केला आहे.