९ वॅट एलईडी योजनेची विदर्भातील सुरुवात होणार अकोल्यातून
By admin | Published: December 25, 2016 05:50 PM2016-12-25T17:50:21+5:302016-12-25T17:50:21+5:30
देशभरात सुरू करण्यात आलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेंतर्गत सातऐवजी नऊ वॅटचे बल्ब देण्याची योजना राज्यात लागू झाली
ऑनलाइन लोकमत/अतुल जयस्वाल
अकोला, दि. 25 - केंद्र सरकारच्या उन्नत ज्योती अफॉर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला) या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेंतर्गत सातऐवजी नऊ वॅटचे बल्ब देण्याची योजना राज्यात लागू झाली आहे. नऊ वॅट एलईडी दिवे केवळ ६५ रुपयांत देण्याच्या योजनेला पुण्यात सुरुवात झाली असून, विदर्भातील सुरुवात अकोल्यातून होणार असल्याची माहिती ही योजना राबविणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
ईईएसएल या कंपनीने महावितरणच्या सहाय्याने महाराष्ट्रात जुलै २०१५ मध्ये एलईडी दिवे वितरित करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सात वॅटचे १० बल्ब प्रत्येकी केवळ ८५ रुपयांना वितरित करण्यात आले. महावितरण आणि ईईएसएल यांच्या वतीने प्रमुख शहरांमध्ये वितरण केंद्रे उभारण्यात आली होती. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळून लाखो एलईडी दिव्यांची विक्री झाली. दरम्यानच्या काळात इतर राज्यांमध्ये या योजनेंतर्गत नऊ वॅटचे एलईडी दिवे वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातही या योजनेंतर्गत नऊ वॅटचे एलईडी दिवे आणण्याचा प्रस्ताव ईईएसल कंपनीने राज्य सरकारपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा किंवा १ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात ९ वॅटचे एलईडी दिवे वितरित करण्यात येणार होते; परंतु हिवाळी अधिवेशनामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. दरम्यान, अधिवेशन आटोपल्यानंतर राज्यात पुणे येथून या योजनेची सुरुवात झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे सर्व मार्ग मोकळे झाल्यामुळे लवकरच राज्यातील सर्वच शहरांमध्ये ही योजना सुरू होणार असून, विदर्भात योजनेची सुरुवात अकोला शहरातून होणार आहे.
केवळ ६५ रुपयांत ९ वॅट एलईडी दिवा
या योजनेअंतर्गत ९ वॅटचा एलईडी दिवा केवळ ६५ रुपयांमध्ये मिळणार आहे. पूर्वीच्या सात वॅट एलईडी योजनेप्रमाणेच या योजनेतही वीजग्राहकास प्रत्येकी ६५ रुपयांमध्ये १० एलईडी दिवे मिळणार आहेत. यामध्ये वीजबिलातून मासिक कपातीचा पर्यायही असणार आहे.
योजनेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे; मात्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. पुण्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भातही योजना सुरु होणार असून, सुरुवात अकोला शहरातून होणार आहे. - दीपक कोकाटे, प्रादेशिक व्यवस्थापक, ईईएसएल, मुंबई.